वारकरी संप्रदायाचे प्रचारक संत नामदेव महाराज यांच्या ७४२ व्या जयंतीनिमित्त शनिवारपासून येथील परशुराम साईखेडकर नाटय़गृहात सायंकाळी ६ ते ८ वाजता पाच दिवसांचा ‘नामदेव महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे दुसरे वर्ष असून त्यात मुक्तसंवाद, व्याख्याने, हरिपाठ, भजन, यांचा समावेश आहे.
महोत्सवात ‘रिंगण’ या आषाढी अंकाच्या संपादकांचा सत्कार करण्यात येणार आहे. दिवाळी अंकाप्रमाणेच आषाढी विशेषाकांची परंपरा रिंगणने सुरू केली असून यंदाचा पहिलाच अंक ‘संत नामदेव विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आला आहे. नामदेवांचे व्यक्तीमत्व, साहित्य आणि अखिल भारतीय कार्य यांवरचे भरपूर साहित्य या अंकात दिलेले आहे. रिंगणच्या निर्मितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचे संपादक सचिन परब व श्रीरंग गायकवाड (मुंबई) यांचा सत्कार नामदेव भक्तीपीठाच्या वतीने करण्यात येणार आहे. कार्यक्रमास चित्रकार शिवाजी तुपे, गणेश ओतुरकर व नाशिक प्रांतिक समाज अध्यक्ष निवृत्ती हाबडे उपस्थित राहणार आहे.
रविवारी हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. सैय्यद जब्बार पटेल यांचे व्याख्यान होईल. सोमवारी इस्कॉनचे प्रतिनिधी नृसिंहकृपा प्रभू यांचे ‘बंगालचे थोर संत चैतन्य गौरंग महाप्रभू’ यांच्या जीवनावर व्याख्यान होईल. मंगळवारी जुन्नर येथील निवृत्त प्राध्यापिका डॉ. मंगलाताई सासवडे यांचे ‘नामवेद जनाबाई-एक विलक्षण अव्दैत’ या विषयावर व्याख्यान होईल. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन नंदन रहाणे, विनोद गणोरे, रत्नाकर लुंगे, यांनी केले आहे.