खुद्द महापौरांच्या देखरेखीखाली वाजतगाजत सुरू झालेल्या महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचे अल्पावधीत तीनतेरा वाजल्याचे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यावरून स्पष्ट झाले आहे. नेहमीप्रमाणे नव्याने हाती घेतलेली मोहीम निव्वळ आरंभशूरता ठरल्याचे दिसत आहे. महापालिकेची ही तऱ्हा असताना दुसरीकडे जबाबदार नागरिक आणि संस्थांचाही कचरा वाढविण्यास हातभार लागत आहे. नाशिक फटाका असोसिएशनने आपला व्यवसाय आटोपल्यावर डोंगरे वसतिगृह मैदानाची कचरा कुंडी बनविली आहे. निवासी भागातही यापेक्षा वेगळे घडत नसल्याने डेंग्यूचे सावट असतानाही स्वच्छता मोहीम कागदावरच राहिली आहे.
डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्यानंतर सत्ताधारी मनसेने ऐन दिवाळीत स्वच्छता मोहीम हाती घेतली. प्रारंभीचे तीन ते चार दिवस खुद्द महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी वेगवेगळ्या भागात भेटी देऊन स्वच्छतेच्या कामावर नजर ठेवली. त्या पाहणीत स्वच्छता विभागाचे काम कोणत्या धाटणीने चालते हे संबंधितांच्या निदर्शनास आले. महापौर व उपमहापौर स्वच्छतेच्या कामावर नजर ठेवत असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीत काही फरक पडेल असे वाटत होते. परंतु ‘पहिले पाढे पंचावन्न’ या पद्धतीने या विभागाचे काम चालत आहे. स्वच्छतेच्या कामी पुढाकार घेणाऱ्या पालिकेच्या मनसबदारांनी नंतर मोहिमेचे काय सुरू आहे याची माहिती घेण्याची बहुधा दक्षता घेतली नाही. यामुळे मोहीम सुरू असताना शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे. पाच महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना स्वच्छतेच्या कामात चाललेली बेपर्वाई कोणाला परवडणारी नाही. कधीकाळी आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घंटागाडी प्रकल्पाची बिकट स्थिती आहे. घराघरांतील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडय़ा चार चार दिवस येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या घंटागाडी कधी येणार, त्यांची वेळ वा दिवस नक्की नसल्याने कचरा संकलनाचे नियोजन कोलमडले आहे. घंटागाडी येत नसल्याने काही नागरिकांनी घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी फेकून देण्याचा सपाटा चालवला आहे. यामुळे कॉलनी व गल्लीतही कचऱ्याचे लहान-मोठे ढीग पाहावयास मिळतात.
नागरिकांप्रमाणे नाशिक फटाका असोसिएशनसारख्या संस्थांनी शहरात जणू कचऱ्याचा डोंगर उभा करण्याचा विडा उचलला आहे. या संघटनेमार्फत गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर फटाके विक्रीची दुकाने थाटण्यात आली. दिवाळीत चांगला व्यवसाय केल्यानंतर जो काही कचरा जमा झाला तो नष्ट करण्याचे औदार्य संघटनेने दाखविले नाही. फटाके विक्रेत्यांनी आपल्या गाळ्यांच्या मागील बाजूस कचरा फेकण्याचे तंत्र अवलंबले. यामुळे आजही व्ही. एन. नाईक महाविद्यालयासमोरील मैदानाच्या कोपऱ्यात कचऱ्याचे ढीग पाहावयास मिळत आहेत. शहरात आतापर्यंत डेंग्यूचे १५३ रुग्ण आढळून आले आहेत. अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या स्थितीत ठिकठिकाणी साचलेला कचरा आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण करणार असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. कचरा संकलनाचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने पालिकेची मोहीम गुंडाळली गेली की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2014 रोजी प्रकाशित
महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचे तीनतेरा
खुद्द महापौरांच्या देखरेखीखाली वाजतगाजत सुरू झालेल्या महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचे अल्पावधीत तीनतेरा वाजल्याचे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यावरून स्पष्ट झाले आहे. नेहमीप्रमाणे नव्याने हाती घेतलेली मोहीम निव्वळ आरंभशूरता ठरल्याचे दिसत आहे.
First published on: 29-10-2014 at 08:36 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik bmc fail to implement cleanliness mission in a city