शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्यास डासांचा प्रादुर्भाव कारणीभूत ठरला असताना डासांचे निर्दालन करणारी पालिकेची यंत्रणा अर्धवट क्षमतेने कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. पालिकेकडे स्वत:ची चार धूर फवारणी यंत्रे आहेत. शहराचा विस्तार लक्षात घेता ती अपुरी असल्याने खासगी तत्त्वावर धूर फवारणीचे काम करवून घेतले जाते. खासगी तत्त्वावरील कामाची मुदत संपुष्टात आल्याने काही दिवसांपासून ते बंद आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या यंत्रणेमार्फत धूर फवारणी केली जात आहे. डेंग्युसदृश रुग्णांची संख्या कमालीची वाढल्यानंतर जाग आलेल्या आरोग्य विभागाने धूर फवारणीच्या कामास मुदतवाढ देण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच दिवाळीत फटाक्यांचा होणारा धूर डासांना पळवून लावण्यास हातभार लावणार आहे. खुद्द महापौरांच्या देखरेखीखाली पालिकेची स्वच्छता मोहीम सुरू असताना सलग दुसऱ्या दिवशी सफाई कर्मचाऱ्यांनी सर्वाच्या नाकावर टिच्चून विलंबाने हजेरी लावली.
शहरात साफसफाईचे काम सुरळीतपणे होत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. ऐन दिवाळीच्या धामधुमीत शहरातील कचरा संकलन व्यवस्था पुरती कोलमडली. घराघरातील कचरा संकलित करणारी घंटागाडी नियमित येत नाही. सार्वजनिक ठिकाणांवरील कचरा उचलला जात नाही. त्यातच, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. या पाश्र्वभूमीवर, तातडीने विभागवार स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वच्छतेच्या कामावर मनसे पदाधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवले जात आहे. ही मोहीम सुरू होत असताना कथडा भागातील फैजम आसिफ शेख (११) याचा डेंग्युसदृश आजाराने मृत्यू झाला. तीन ते चार दिवसात डेंग्युसदृश रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. एकूण रुग्णांची संख्या १४० वर गेली असून त्यातील १३३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील ६८ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील ५१ रुग्ण महापालिका हद्दीतील तर १७ रुग्ण शहराबाहेरील आहेत. याचा विचार केल्यास शहरातील स्थिती गंभीर असल्याचे लक्षात येते.
महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सलग दुसऱ्या दिवशी स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. त्यांनी अचानकपणे नाशिक पश्चिम, सिडको, सातपूर विभागीय कार्यालय व परिसरातील हजेरी शेडला भेट दिल्या. अनेक भागात सफाई कर्मचारी उशिराने उपस्थित झाल्याचे लक्षात आले. स्वच्छतेच्या कामात पालिका कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वच्छता मोहिमेची ही तऱ्हा असताना डासांचे निर्मूलन करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या धूर फवारणीची वेगळी स्थिती नाही. शहरात आठ यंत्र आणि एक वाहनावरील यंत्रामार्फत धूर फवारणीचे काम सुरू होते. त्यात निम्मी यंत्र पालिकेची तर निम्मी ठेकेदाराची होती. खासगी तत्त्वावर देण्यात आलेल्या कामाची मुदत संपुष्टात आल्याने
पालिका यंत्रणेमार्फत शक्य ते काम केले जात आहे. आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी त्यास दुजोरा दिला. धूर फवारणीचे काम निम्मे बंद असल्याने आधीच्या ठेकेदारास मुदतवाढ
दिली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्या
डेंग्यूचा प्रसार – साचलेल्या पाण्यात, स्वच्छतेच्या अभावाने एडीस इजिप्त जातीचे मच्छर (डास) वाढतात. कुंडय़ा, टायर, नारळाच्या कवटय़ा, प्लास्टिकची रिकामी भांडी त्यांच्या वाढीसाठी पोषक ठरतात. या डासांचे चावा घेण्याचे प्रमाण दिवसा अधिक असते.
ल्ल रुग्णांमधील लक्षणे – डेंग्यूची साधारणत: चार टप्प्यात तीव्रता विभागली जाते. डेन १, डेन २, डेन ३ आणि डेन ४. डेंग्यू तापात लहान मुलांमध्ये मुख्यत्वे सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठय़ा माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडा मोडणारा ताप असेही म्हणतात. डेंग्यू रक्तस्त्राव ताप गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे. यात तापाबरोबर बाह्य़ रक्तस्त्राव होतो. चट्टे उठणे, हिरडय़ांमधून रक्तस्त्राव, तसेच अंतर्गत रक्तस्त्राव होण्याची शक्यता आहे. प्लेटलेट्सची संख्या कमी होणे असे प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटात पाणी जमा होऊ शकते. डेग्यु अतिगंभीर आजारात रक्तस्त्राव तापाची पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्ये ते दिसून येते. अस्वस्थ वाटणे, अंग थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे ही त्याची लक्षणे असू शकतात.
ल्ल उपचार – डेंग्यूची प्राथमिक लक्षणे आढळल्यास रुग्णाने त्वरित जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अथवा खासगी दवाखान्यात तपासणी करावी. जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘एलायझा’ रक्त तपासणीच्या माध्यमातून आजार आहे ही नाही याची पडताळणी होते. प्रतिबंध हाच त्यावर उपचार असून डासांना आळा घालण्यासाठी घराच्या आजूबाजूना पाणी साठू न देणे, वेळच्या वेळी साठवलेले पाणी रिकामे करणे, पाण्याची भांडी स्वच्छ घासून उन्हात वाळत ठेवणे, अंगावर पूर्ण कपडे घालणे आदी प्रतिबंधात्मक उपाय करता येऊ शकतात.
संग्रहित लेख, दिनांक 24th Oct 2014 रोजी प्रकाशित
धूर फवारणीसाठी तोकडी यंत्रणा
शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्यास डासांचा प्रादुर्भाव कारणीभूत ठरला असताना डासांचे निर्दालन करणारी पालिकेची यंत्रणा अर्धवट क्षमतेने कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.

First published on: 24-10-2014 at 02:02 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik corporation working hard for stopping dengue