केरळस्थित संस्थेचे नाव आणि नोंदणी दाखवीत काही जण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) निवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी, निवृत्तिवेतन व बोनसचा लाभ मिळण्यासंदर्भात शुल्क व अर्ज भरणे आवश्यक असल्याचे सांगून दिशाभूल करीत असल्याचे येथील जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानने लक्षात आणून दिले आहे. एचएएलच्या निवृत्तीधारकांनी अशा मंडळींपासून सावध राहण्याचा इशाराही
प्रतिष्ठानने दिला असून, कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नसल्याचे प्रतिष्ठानने नमूद केले आहे.
काही जणांकडून होत असलेल्या दिशाभूलमुळे निवृत्त एचएएल कर्मचाऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला असल्याचे लक्षात घेऊन एचएएलमधील निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान या संस्थेने निवृत्त एचएएल कर्मचाऱ्यांना दिशाभूल करणाऱ्या मंडळींपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. जे कर्मचारी जून २००९च्या आधी निवृत्त झाले आहेत. ज्यांना १९७१ची कुटुंब निवृत्तिवेतन योजना लागू होती. तसेच ज्यांचे विलीनीकरण १९९५च्या निवृत्तिवेतनात आपोआप समाविष्ट झाले आहे. अशा सर्वाना कमीतकमी एक हजार रुपये निवृत्तिवेतन १ एप्रिल २०१४ पासून आपोआप मिळणार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने तसेच दोन महिन्यांचा बोनसही निवृत्तिवेतनाच्या अगदी सुरुवातीपासून ‘पीपीओ’ नंबरप्रमाणे त्यांच्या खात्यात आपोआप जमा होणार असल्याचे प्रतिष्ठानने नमूद केले आहे. या सर्व व्यवहारासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज भरणे किंवा २५० रुपये अथवा कुठलेही नोंदणी शुल्क भरण्याची आवश्यकता नसल्याचेही प्रतिष्ठानने म्हटले आहे. असे असले तरी जून २००९ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना
माहितीसाठी अर्ज भरणे गरजेचे आहे, परंतु त्यासाठी कुठलेच शुल्क देण्याची गरज नाही. प्रतिष्ठानतर्फे अर्ज भरून घेण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
सध्या काही जण केरळ स्थापित संस्थेचे नाव आणि नोंदणी दाखवून रुपये २५० शुल्क स्वरूपात भरणे अतिआवश्यक असल्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांना सांगत आहेत. अर्ज भरणेही कसे आवश्यक आहे हे पटवून देत आहेत. हा सर्व प्रकार निवृत्त कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचा असून कर्मचाऱ्यांनी अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे सरचिटणीस नंदकुमार औरंगाबादकर (९७३०१५२४०९), अध्यक्ष सुरेश देसले (०२५३-२३०४६२७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Aug 2014 रोजी प्रकाशित
केरळस्थित संस्थेच्या नावाने एचएएल निवृत्त कर्मचाऱ्यांची दिशाभूलनिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठानचा सावधानतेचा इशारा
केरळस्थित संस्थेचे नाव आणि नोंदणी दाखवीत काही जण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) निवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधी
First published on: 26-08-2014 at 06:56 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik news