मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग, ठक्कर बाजारसह अन्य बस स्थानकांना खासगी प्रवासी वाहतूकदार आणि त्यांच्या दलालांचा विळखा पडला असून संबंधितांची दादागिरी पराकोटीला जाऊनही पोलीस यंत्रणेने आपण जणू त्या गावचे नाही, असे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. वास्तविक, बस स्थानकांसभोवतालचा २०० मीटरचा परिसर उच्च न्यायालयाने ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर केला आहे. या परिसरात खासगी प्रवासी वाहने उभी करण्यास मज्जाव आहे. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तिकीटांची नोंदणीला प्रतिबंध आहे. असे असुनही सर्वत्र खासगी प्रवासी वाहतूकदार व दलालांचा सुळसुळाट असून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याकडे पोलीस यंत्रणेना कानाडोळा केल्यामुळे दलालांकडून एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्यासारख्या घटना घडत असल्याचा आरोप केला जात आहे.
त्र्यंबक रस्त्यावरील ठक्कर बझार या नवीन बसस्थानकात जालना आगाराचे चालक एन. जी. नेरकर यांना काही दलालांनी मारहाण करून तिक्ष्य हत्यार पोटाला लावून जिवे मारण्याची धमकी दिली. स्थानकाच्या आवारात काही संशयित तरुण पुणे, औरंगाबाद, मुंबईचे प्रवासी खासगी प्रवासी वाहतुकीकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होते. नेरकर यांनी त्यांना हटकले असता तरुणांनी त्यांना मारहाण केली. एकाने धारधार हत्यार पोटाला लावून जिवे मारण्याची धमकी दिली. इतर चालक-वाहकांनी मध्यस्ती करून नेरकर यांची टोळक्याच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी नेरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बस स्थानक परिसरात एसटी कर्मचारी सुरक्षित नसल्याचे दर्शविले आहे. अनेक बसस्थानकांत खासगी वाहतुकदारांच्या दलालांचा सुळसुळाट होण्यास स्थानिक पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी केला.
शहरातील महामार्ग, मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) व नवीन ठक्कर बझार बसस्थानकावर फेरफटका मारल्यास स्थानक एसटी महामंडळाचे की खासगी वाहतूकदारांच्या दलालांचे असा प्रश्न पडतो. प्रवेशद्वारावर १० ते १५ जणांचे टोळके स्थानकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना अप्रत्यक्षपणे अडविण्याचा प्रयत्न करते. कमी दराचे अमिष दाखवून एसटी स्थानकावर चाललेल्या प्रवाशांना बाहेर पळवून नेण्याचे हे प्रकार अहोरात्र खुलेआम सुरू असतात. काही स्थानकांवर आतमध्ये घुसखोरी करून एसटी कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिच्चून आरडाओरड करून प्रवासी पळविले जातात, मात्र बाहेर गावाहून आलेले वाहक व चालक फारसे काही करू शकत नाहीत. ज्या कर्मचाऱ्याने शांततेच्या मार्गाने विचारणा करण्याचा प्रयत्न केला, त्याला बेदम मारहाण करण्यात आली. वास्तविक, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमारे १० वर्षांपूर्वी बसस्थानकाच्या सभोवतालचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर केला आहे. खासगी प्रवासी वाहतुकदार एसटी महामंडळाचे प्रवासी पळवून नेऊ नये म्हणून २०० मीटरच्या परिसरात खासगी प्रवासी वाहने उभी केली जाऊ नयेत म्हणून निर्देश देण्यात आले. तसेच या परिसरात खासगी प्रवासी वाहतुकदारांना प्रवासी नोंदणी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमबजावणीची जबाबदारी स्थानिक पोलीस यंत्रणेची आहे. ही अंमलबजावणी होत नसल्याने खासगी प्रवासी वाहतुकदार आणि दलालांचे फावले असल्याचे ताटे यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याबद्दल संघटना दाद मागणार असल्याचे सांगितले.
मुंबई नाका परिसरात महामार्ग बसस्थानक आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस विभागाचे कार्यालय आहे. या ठिकाणी महामार्ग स्थानकासमोर खासगी बसेस उभ्या करून प्रवासी पळविण्याचे काम चोवीस तास सुरू असते. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या खासगी बसेसमुळे शहराची वाहतूक व्यवस्था वेठीस धरली जाते. वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाजवळील बसस्थानकावर ही स्थिती असल्यास इतर बसस्थानकांचा विचार न केलेला बरा, अशी प्रवासी वर्गाची प्रतिक्रिया आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2014 रोजी प्रकाशित
एसटीला खासगी प्रवासी वाहतुकदारांचा विळखा
मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग, ठक्कर बाजारसह अन्य बस स्थानकांना खासगी प्रवासी वाहतूकदार आणि त्यांच्या दलालांचा विळखा पडला असून संबंधितांची दादागि
First published on: 11-11-2014 at 06:47 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik news