ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे यंदा सातवे वर्ष. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या मोहिमेच्या नाशिक विभागातील कामगिरीचा वेध मालिकेद्वारे घेण्यात येत आहे. मालिकेतील दहावा लेख.
तंटामुक्त मोहिमेंतर्गत आपसातील वाद मिटवणे हा मुख्य उद्देश असला तरी त्या संपूर्ण कामकाजाचा अहवाल अर्थात ‘अभिलेख’ तयार करणे महत्त्वपूर्ण काम पार पाडावे लागते. कारण, प्रत्येक गावातील तंटामुक्त गाव समितीने वर्षभरात काय काम केले याचा आरसा शासनासमोर अभिलेखाच्या रूपाने उभा राहतो. शासन तंटामुक्त गाव जाहीर करताना या अभिलेखांची काटेकोरपणे तपासणी करते. यामुळे मोहिमेच्या प्रत्येक कामाची नोंद योग्य पद्धतीने ठेवणे आवश्यक ठरते. अभिलेखांशी संबंधित समितीच्या निमंत्रकावर महत्त्वपूर्ण जबाबदारी निभवावी लागते.
दरवर्षी १५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत या मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने नवीन वर्षांतील कामकाजास सुरुवात होते. गावातील अस्तित्वातील तंटे मिटविणे, नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे, त्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे अशी विविध कामगिरी तंटामुक्त गाव समितीला एकाचवेळी करावी लागतात. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नोंदवही ठेवणे, तंटय़ांसंबंधी माहिती संकलित करणे, नोंद घेणे, त्यांचे वर्गीकरण करणे आदी कामे समितीच्या निमंत्रकांना करावी लागतात. परंतु, ही कामे अभिलेख समितीचे निमंत्रक व अध्यक्षांच्या स्वाक्षरीने होतात. गावातील दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर स्वरूपाच्या तंटय़ांची माहिती संकलित केल्यावर प्रत्येक तंटय़ाची त्या त्या प्रकारात नोंद करावी लागते. त्याकरिता वेगवेगळ्या नोंद वह्यांचा वापर करावा लागतो. फौजदारी मिटविता येण्यासारखे दखलपात्र तंटे यांची नोंद नोंदवही २ (अ) मध्ये करावी लागते तर मिटविता न येणारे दखलपात्र फौजदारी तंटय़ाची नोंद नोंदवही – २ (ब) मध्ये करावी लागते. नव्याने निर्माण झालेले तंटय़ांची नोंद त्यांच्या प्रकारानुसार नोंदवही – ३ (अ) मध्ये व नोंदवही – ३ (ब) मध्ये केली जाते. मिटलेल्या तंटय़ांची नोंद – ३ (अ) मध्ये करण्यात येते.
या मोहिमेंतर्गत तंटे आणि तणाव निर्माण होण्याची कारणे शोधून त्यांचे निर्मूलन होईल यासाठी कार्यवाही केली जाते. सामाजिक शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने लोकांमध्ये जागृती निर्माण करणे व त्यांचे प्रबोधन करणे, ग्रामसंरक्षण, सामाजिक सुरक्षितता आदींबाबत विविध उपक्रम हाती घेतले जातात. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधी केलेल्या अशा कार्यवाहीची विशिष्ट पद्धतीने नोंद केली जाते. म्हणजे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उपशीर्ष, राबविलेली योजना, राबविलेल्या उपक्रमांची माहिती, सहभागी व्यक्ती, राबविलेल्या उपक्रमांमुळे झालेले परिणाम या पद्धतीने नोंद घेतली जाते. तंटय़ांचे वर्गीकरण, निराकरण करताना एक विशिष्ट पद्धतीत हे अभिलेख राहतील, याचीही दक्षता घेण्यात आली आहे. अभिलेखांचे जतन करण्याची ही प्रक्रिया काहीशी क्लिष्ट वाटत असल्याने समिती सदस्य व निमंत्रकांना मोहिमेच्या सुरवातीस पोलीस ठाण्यांकडून प्रशिक्षणही दिले जाते. यामुळे प्रत्येक गावातील समितीचे कामकाज आणि अहवाल अर्थात अभिलेख एकसमान पद्धतीत राखणे शक्य झाले आहे.