नवी मुंबई महापालिकेतील भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना पुढे आला असून ऐरोली, नेरुळ आणि बेलापूर येथील रुग्णालयांमधील उपकरणांच्या खरेदीचा सुमारे १०० कोटी रुपयांचा वादग्रस्त प्रस्ताव मागे घेतल्यानंतर यासंबंधीचा ३९ कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आला आहे. १०० खाटांच्या रुग्णालयासाठी सुमारे ३०० खाटांची उपकरणे खरेदीचा प्रस्ताव तयार करून आरोग्य विभागाने घेतलेली कोटी रुपयांची उड्डाणे ‘लोकसत्ता’ने यापूर्वीच उघड केली आहेत. आरोग्य विभागातील हे गौडबंगाल आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या लक्षात येताच त्यांनी हा प्रस्ताव तातडीने मागे घेतला. आबासाहेबांच्या आदेशानंतर यासंबंधीचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यानुसार १०० कोटी रुपयांच्या जुन्या कामाचा खर्च ३९ कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. म्हणजेच तब्बल ६१ कोटी रुपयांनी हे कंत्राट यापूर्वी फुगविले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून हा दौलतजादा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आबासाहेब कोणती कारवाई करतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेला कंत्राटी कामातील कोटय़वधी रुपयांची उड्डाणे नवी नाहीत. तत्कालीन आयुक्त विजय नहाटा यांच्या कार्यकाळात सुरू झालेली ही उड्डाणे भास्कर वानखेडे हे आयुक्त असतानाही सुरूच राहिली. नवी मुंबईत निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते विकण्याची महापालिकेच्या योजनेचीही एव्हाना वासलात लागली आहे. असे आतबट्टयाचे प्रकल्प उभारण्यात महापालिका नेहमीच आघाडीवर राहिली आहे. असे असताना रुग्णालयीन उपकरणे खरेदीची कंत्राटेही फुगवून सादर केले जात असल्यामुळे आरोग्य विभागातील सावळागोंधळ नुकताच उघड झाला आहे. महापालिकेने ऐरोली आणि नेरुळ येथे प्रत्येकी १०० खाटांची दोन रुग्णालये तर बेलापूर येथे माताबाल अशी तीन रुग्णालये उभारली आहेत. या रुग्णालयात उपकर तसेच फर्नीचर खरेदीचा एक प्रस्ताव मध्यंतरी आरोग्य विभागाने सर्वसाधारण सभेपुढे मांडला. १०० खाटांच्या या रुग्णालयांसााठी थेट ३०० खाटांची उपकरणे, फर्नीचर खरेदी दाखविण्यात आली. अशाप्रकारे नेरुळ येथील रुग्णालयासाठी ४७ कोटी तर ऐरोली येथील रुग्णालयासाठी थेट ५७ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला. १०० खाटांच्या रुग्णालयासाठी ३०० खाटांची खरेदी हवी कशाला, असा प्रश्न महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी उपस्थित करताच आरोग्य अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. यातील गौडबंगाल लक्षात येताच अखेर आबासाहेबांना हा प्रस्ताव विषयपटलावरून मागे घेण्याची नामुष्की पत्करावी लागली.
नवा प्रस्ताव ३९ कोटींचा
यासंबंधीचे सविस्तर वृत्त यापूर्वीच लोकसत्ताने प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य विभागातील सावळागोंधळ उघड झाला. १०० कोटी रुपयांचा आतबट्टयाचा प्रस्ताव बारगळल्यानंतर खडबडून जागे झालेल्या आबासाहेबांनी आरोग्य अधिकाऱ्यांना नवा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. यानुसार आरोग्य अधिकारी निकम यांनी येत्या सर्वसाधारण सभेपुढे सुधारित प्रस्ताव सादर केला असून त्यानुसार १०० कोटींचे काम थेट ३९ कोटींपर्यंत कमी झाले आहे. नव्या प्रस्तावानुसार नेरुळ येथील १०० खाटांच्या रुग्णालयासाठी १५ कोटी ५७ लाखांचा (यापूर्वीचा प्रस्ताव ४६ कोटी) प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तर ऐरोली आणि बेलापूर येथील माताबाल रुग्णालयासाठी सुमारे २३ लाख रुपयांचा (यापूर्वीचा प्रस्ताव ५४ कोटी रुपयांचा) प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आला आहे. आबासाहेब जऱ्हाड यांनी आरोग्य विभागाची चूक सुधारली असली तरी ३९ कोटींचे काम थेट १०० कोटी रुपयांपर्यत कसे पोहचले, याचे उत्तर मात्र आयुक्तांनी अद्याप दिलेले नाही. हे कंत्राट कसे आणि कुणाच्या सांगण्यावरून फुगविण्यात आले, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरितच आहे. विशेष म्हणजे, ६१ कोटी रुपयांचा वाढीव प्रस्ताव सादर करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे धारिष्टय़ही आबासाहेबांना दाखविता आलेले नाही. महापालिकेतील कंत्राटी कामांचे प्रस्ताव कसे फुगविले जातात, याचा हा नमुना असून यामुळे नवे आयुक्त चक्रावून गेल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.