विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या उरणला नववर्षांच्या स्वागताचा रंग चढू लागला आहे. बुधवार सकाळपासून तरुणाईची पावले या ठिकाणी वळू लागतात. नववर्षांच्या स्वागतासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्साहाच्या भरात रंगाचा कोठेही बेरंग होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे बारीक लक्ष राहणार असल्याची माहिती न्हावा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.
नववर्षांचे स्वागत आनंद आणि उत्साहात होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता उरण पोलिसांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तळीरामांवर व अतिउत्साहीतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यातील नाक्यानाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांची तपासणीदेखील करण्यात येणार आहे. राज्यात रेड अर्लट जाहीर करण्यात आल्याने संवेदनशील असलेल्या उरण तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उरण, मोरा सागरी पोलीस ठाणे तसेच न्हावा शेवामधील पोलीस सज्ज झाले आहेत. उरणला समुद्रकिनारा असल्याने नववर्षांच्या स्वागतासाठी उरणमधील अनेक हॉटेलांत शेजारी जिल्ह्य़ातील पर्यटक मोठय़ा संख्येने येतात. त्यांची सुरक्षा तसेच तळीरामांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे.
उरण शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले असून या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे. उरण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वशेणी, चिरनेर, बोकडवीरा आदी भागांत अधिकचे पोलीसबळ तैनात करण्यात येणार असून सुरक्षा म्हणून उरणमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तसेच त्यातील प्रवाशांचीही तपासणी करण्यात येणार आहे. या पोलिसांच्या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन साहाय्यक पोलीस आयुक्त बोराटे यांनी केले आहे.