नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने सोनाग्राफी सेंटरवर केलेल्या कारवाया, राबविलेली जनजागृती मोहीम, शहरात वाढलेली सुशिक्षिताची टक्केवारी या सर्व कारणांमुळे नवी मुंबईत मुलीचा जन्मदर वाढला असून आरोग्य संचालकांनी केलेल्या सर्वेक्षणात नवी मुंबई पालिका राज्यात पहिली व नगरपालिकांमध्ये रत्नागिरी पालिका पहिली ठरली आहे. त्यामुळे मुली नवी मुंबईकरांना आवडत्या असल्याचे स्पष्ट झाले असून एक लाडकी नवी मुंबईची असे चित्र आहे.
देशात मुलगी होण्याअगोदरच तिचा गळा दाबविण्याचा प्रकार अनेक काळापासून सुरू असून तो आजही बंद झालेला नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मुलगी की मुलगा यांची निदान करणाऱ्या सोनाग्राफी सेंटरनाच ताकीद दिली आहे.
नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने सोनाग्राफी सेंटरची केलेल्या तपासणीत डझनभर सोनाग्राफी सेंटरना आतापर्यंत सील ठोकले आहे. त्यामुळे मुलगा की मुलगी याचे निदान करण्याची यंत्रणाच बंद झाल्याने स्त्री भ्रूणहत्येला आळा बसला आहे.
त्याचप्रमाणे राज्यात सर्वात सुशिक्षित शहर म्हणूनही नवी मुंबईकडे पािहले जाते. शहरातील ९८ टक्के नागरिक सुशिक्षित असल्याचे पाहणीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे २००२ मध्ये ८४९ असा मुलींचा जन्मदर असलेल्या या शहरात जनजागृती आणि प्रबोधन तसेच कायद्याचा बडगा उगारल्याने मुलींचा जन्मदर वाढला आहे.
राज्य सरकारने स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असून पालिकेने या आदेशाची चांगली अंमलबजावणी केल्याने २००२ पासून टप्प्याटप्प्याने मुलीच्या जन्मदरामध्ये वाढ झाली आहे.