रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील अभ्यासक्रमांना विद्यार्थीच मिळत नसल्यासारखी अभूतपूर्व स्थिती उद्भवली आहे. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा नुकताच रामटेकच्या किट्स अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला. परंतु, हा सोहळा गोंधळानेच अधिक गाजल्याने विद्यार्थ्यांमधील असंतोष चव्हाटय़ावर आला होता. मिळालेल्या माहितीनुसार रामटेक कॅम्पसमध्ये यावर्षी एकही प्रवेश नोंदविण्यात आलेला नाही तसेच नागपूर केंद्रातही २०१३-१४ शैक्षणिक वर्षांसाठीच्या अनेक जागा रिक्त आहेत.
संस्कृत विद्यापीठाच्या नागपूर केंद्रात एम.फिल.चे सहा अभ्यासक्रम चालविण्यात येतात. यापैकी एम.फिल. (वेद) अभ्यासक्रमासाठी एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला नाही. एम.फिल साहित्य अभ्यासक्रमासाठी सात, व्याकरणासाठी एक, दर्शन अभ्यासक्रमासाठी एक, वेदांग ज्योतिषसाठी तीन आणि शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमासाठी चार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी २० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सोय आहे. मास्टर ऑफ आर्ट्स (एम.ए.) अभ्यासक्रमाचे आठ अभ्यासक्रम विद्यापीठात असले तरी एम.ए. वेद अभ्यासक्रमाला एकही विद्यार्थी मिळालेला नाही. एम.ए. दर्शनच्या पहिल्या वर्षांसाठी सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. एम.ए. योगशास्त्रसाठी सात, एम.ए. शिक्षणशास्त्रसाठी तीन तर एम.ए. वेदांग ज्योतिषसाठी सहा प्रवेश झालेले आहेत.
बी.ए.चे तीन अभ्यासक्रम विद्यापीठात उपलब्ध असून बी.ए. संस्कृत विशारद अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांत सात विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. वेदांग ज्योतिषसाठी नऊ तर शिक्षणशास्त्रासाठी तेरा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एकूण प्रवेशक्षमता ६० विद्यार्थ्यांची आहे.
पदविकेचे दोन अभ्यासक्रम विद्यापीठात असून ६० जागांची क्षमता असली तरी फक्त सहा प्रवेश झाल्याची माहिती मिळाली आहे. एम.एड. अभ्यासक्रमासाठी ३५ विद्यार्थी क्षमता असताना फक्त चारच प्रवेश झाले आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे रामटेक कॅम्पसमध्ये एकही प्रवेश झालेला नाही. गेल्या चार वर्षांत संस्कृत विद्यापीठात ५६१ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. तर १८८६ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली. तर २८९५ विद्यार्थी पदविका उत्तीर्ण झाले. दरवर्षी सरासरी १४० विद्यार्थी पदव्युत्तर , ४७२ विद्यार्थी पदवी तर ८३६ विद्यार्थी पदविका उत्तीर्ण होतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ८० टक्के शिक्षक प्रशिक्षित नाहीत. राज्य सरकार संस्कृत विद्यापीठाच्या प्रशासनावर ५ कोटी रुपयांचा खर्च करीत आहे. अप्रशिक्षित शिक्षक आणि शिक्षणाचा सुमार दर्जा यामुळे विद्यार्थी संस्कृत विषयाकडे वळत नाहीत.