मुंबई ते सिंधुदुर्ग या राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक नागरिक व मच्छीमारांना आगोटीच्या म्हणजेच पहिल्या पावसाची तीव्रतेने आस असते, कारण यावेळी पहिल्या पावसाच्या सरीबरोबरच खाडीकिनारी प्रजननासाठी आलेल्या शिंगाली या जातीच्या माशाचे प्रजनन झालेले असते. या छोटय़ा शिंगालीला उरण परिसरात चिवणा असे संबोधिले जाते. पावसाला सुरुवात होताच ही मासळी मोठय़ा प्रमाणात खाडीकिनाऱ्यावर येते. या आगोटीच्या चिवण्याची वर्षभर वाट पाहणाऱ्या मच्छीमार आणि खवय्यांची मात्र सध्या उरण परिसरात निराशा होऊ लागली असून, या परिसरात विकासाच्या नावाने होणाऱ्या मातीच्या भरावामुळे खाडीची नैसर्गिक  मुखे बंद केली जात आहेत.
जेएनपीटी बंदरासह इतर अनेक रासायनिक कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी व तेलतवंगामुळेही आगोटीच्या चिवण्यांच्या संख्येत घट झाली असल्याने, येथील पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवरही याचा परिणाम जाणवू लागला आहे. उरण तालुक्यातील वशेणी, विंधणे, आवरे, सारडे, पाले, पिरकोन, गोवठणे, खोपटे, कोप्रोली, कळंबुसरे,मोठी जुई, बोरखार, धुतूम, दादरपाडा, चिल्रे, दिघोडे, पाणजे, फुडे, बोकडविरा, भेंडखळ, पागोटे, नवघर, कुंडेगाव, डोंगरी, काळाधों या गावांशेजारी खाडी आहे. या खाडीत समुद्रातून आलेल्या भरतीच्या पाण्यासोबत खाडीच्या मुखातील प्रजनन झालेली मासळी मोठय़ा संख्येने येते. काही वेळा तर हजारोंच्या संख्येने ही मासळी येते. मात्र याच परिसरात सिडको, जेएनपीटी, तसेच विविध खासगी गोदामे व नवी मुंबई सेझसाठी करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे अनेक ठिकाणच्या खाडीची मुखेच बंद झाल्याने खाडीतून समुद्रात पाणी ये-जा करण्याची नसíगक प्रक्रियाच बंद झाली आहे. त्याचप्रमाणे जेएनपीटी बंदरातील तेलयुक्त व रासायनिक द्रवपदार्थाची हाताळणी करणारे स्वतंत्र बंदर असून, यासाठी परदेशातून येणाऱ्या महाकाय जहाजातील तेल व रसायनांचा, तसेच जेएनपीटीच्या खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल तसेच इतर रासायनिक पदार्थाची साठवणूक करणाऱ्या टँक फार्ममधील गळती झालेले तेल व रसायनेही खाडी आणि समुद्रकिनारी तेलतवंग निर्माण करीत असल्याने पसरलेल्या प्रदूषणाचाही परिणाम मासळीतील घटीवर झाला असल्याचे मत आकाश भोईर यांनी व्यक्त केले आहे.