उष्णतेचा तडाखा बसण्यास सुरूवात झाली असतानाच दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या गावांच्या संख्येतही तितक्याच झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. नाशिक विभागात तब्बल ३९८ गावे आणि ११८१ वाडय़ांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गाव व वाडय़ांना एकूण ४४४ टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात असून जसजसे ऊन तापत जाईल, तसतसे या गावांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे दिसत आहे. पाण्याबरोबर गुरांसाठीच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण भटकंती होत असूनही उत्तर महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यात आजतागायत चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. विभागात केवळ नगर जिल्ह्यात २४० चारा छावण्या सुरू असल्याची विभागीय टंचाई शाखेने दिली आहे.
गेल्या महिन्यात शासनाने ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील २३२६ गावांची यादी जाहीर करून त्या गावांमध्ये टंचाईसदृश्य स्थिती असल्याचे जाहीर केले होते. या गावांसाठी वेगवेगळ्या सवलती शासनाने जाहीर केल्या आहेत. पावसाअभावी यंदा ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके बसू लागले असताना शासनाच्या निकषामुळे टंचाईचे संकट भेडसावणाऱ्या काही गावांना सवलतींचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेली उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ११७६ गावे जळगाव जिल्ह्यातील असून सर्वात कमी २४५ गांवे धुळे जिल्ह्यातील आहेत. नाशिक जिल्ह्यातील ९०२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नसल्याचे या यादीवरून अधोरेखीत झाले होते. विभागात टंचाईग्रस्त गावांची सर्वाधिक संख्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. यंदा प्रथमच हजारोंच्या संख्येने गावे टंचाईच्या संकटाचा सामना करत आहे. मार्चच्या

प्रारंभापासून उन्हाचा तडाखा बसू लागल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी दिवसागणिक वाढत आहे. सद्यस्थितीचा विचार केल्यास संपूर्ण विभागात एकूण ४४४ टँकरच्या माध्यमाने ३९८ गावे व ११८१ वाडय़ांना पाणी पुरवठा केला जात आहे.
नाशिक विभागात टँकरची सर्वाधिक म्हणजे २८३ इतकी संख्या एकटय़ा अहमदनगर जिल्ह्यात आहे. या भागातील २४३ गावे व ९५४ वाडय़ांना दररोज उपरोक्त टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. धरणांच्या जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्येही टंचाईचे चटके बसत आहे. या जिल्ह्यातील १०० गावे व २२७ वाडय़ांना ११५ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नसून ४५ गावांना ५४ टँकरद्वारे तर धुळे जिल्ह्यात एका गावाला एका टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शासनाने टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर करताना हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर केलेल्या तालुक्यातील मंडळस्तरावर एक चारा छावणी उघडण्याचा अंतर्भाव होता. परंतु, या निकषाची उत्तर महाराष्ट्रात अंमलबजावणी का झाली नाही याची स्पष्टता होत नाही. नाशिक विभागात नगर वगळता इतरत्र कुठेही गुरांसाठी चारा छावणी नसल्याचे विभागीय टंचाई शाखेने म्हटले आहे. नगर जिल्ह्यात २४० चारा छावण्या सुरू आहेत. परंतु, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात एकही चारा छावणी उघडण्याची गरज भासली नाही. या परिसरात चाऱ्याची उपलब्धता असल्याने छावणी उघडण्यात आली नसल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.