अमरावती विभागात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा झपाटय़ाने कमी होत असून विभागातील मोठय़ा, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ७६६ दशलक्ष घनमीटर म्हणजे २५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठय़ा प्रकल्पांमध्येही ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. या प्रकल्पांमधून अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो. शिल्लक साठा कमी असल्याने काही भागात पाणी कपातीची वेळ आली आहे.
अमरावती विभागातील ९ मोठय़ा प्रकल्पांची क्षमता १ हजार ५४० दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये ४०६ दलघमी (२६ टक्के) जलसाठा उरला आहे. ६५९ दलघमी क्षमतेच्या २३ मध्यम प्रकल्पांमध्ये २०७ दलघमी (३१ टक्के), तर ४५८ दलघमी क्षमतेच्या ३३८ लघू प्रकल्पांमध्ये ८५८ दलघमी (१८ टक्के) पाणी शिल्लक आहे. या प्रकल्पांमधून बाष्पीभवनामुळे पाणी कमी होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. सिंचनासाठी काही प्रकल्पांमधून पाणी वापरले जात असताना घट अपरिहार्य असली, तरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण ठेवले गेल्याने काही प्रकल्पांना धोका नाही. मात्र, काही धरणांमध्ये केवळ मृतसाठा शिल्लक उरला आहे.
विभागातील सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा प्रकल्पातून अमरावती आणि इतर काही शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या १८३ दलघमी (३२ टक्के) पाणीसाठा आहे. अमरावती शहराला मुबलक पाणी पावसाळ्यापर्यंत मिळू शकेल, अशी स्थिती आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात मात्र केवळ १६ दलघमी (१९ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३५ दलघमी (३८ टक्के), अरुणावती प्रकल्पात ५० दलघमी (२९ टक्के), बेंबळा प्रकल्पात ७७ दलघमी (२५ टक्के), बुलढाणा जिल्ह्यातील वाण प्रकल्पात ४० दलघमी (४९ टक्के), नळगंगा प्रकल्पात तर ५ दलघमी म्हणजे केवळ ७ टक्केच पाणीसाठा उरला आहे. पेनटाकळी आणि खडकपूर्णा प्रकल्पात तर पाण्याची साठवणूकच झाली नाही. 
गेल्या वर्षी याच कालावधीत अमरावती विभागातील सर्व सिंचन प्रकल्पांमध्ये २१ टक्के पाणीसाठा होता. यावर्षीही अशीच स्थिती आहे. २०११ मध्ये मात्र या काळात ३४ टक्के पाणीसाठा होता. विभागात गेल्या वर्षी उशिरा पावसाळा सुरू झाला. पण, नंतर पावसाने कसर भरून काढली. काही प्रकल्प तर तुडूंब भरले. पण, मोठय़ा प्रमाणावर पाणी वापरले गेल्याने जलसाठा झपाटय़ाने कमी झाला. त्यातच कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे.
  संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2013 रोजी प्रकाशित  
 अमरावती विभागात केवळ २५ टक्के पाणीसाठा
अमरावती विभागात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा झपाटय़ाने कमी होत असून विभागातील मोठय़ा, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ७६६ दशलक्ष घनमीटर म्हणजे २५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत.
  First published on:  02-05-2013 at 03:59 IST  
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 25 water stock in amravati region