फेरीवाल्यांनी नोंदणीप्रक्रिया नेमकी कशी करायची याच्या गुंत्यात महानगरपालिका प्रशासनाचा पाय गुंतत चालला असताना फेरीवाले संघटनांनी मात्र वेगळीच शक्कल लढवली आहे. प्रशासन, नगरसेवक यांच्या हितसंबंधात संघटनेच्या फेरीवाले सदस्यांवर अन्याय होऊ नये म्हणून खुद्द एका संघटनेनेच व्हिडीओ शूटिंगसह नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने फेरीवाले नोंदणीसाठी समिती स्थापन केली खरी, मात्र ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ म्हणतात त्याप्रमाणे मुहूर्तापासूनच गोंधळाला सुरुवात झाली. समितीवर कोणाला घ्यायचे इथपासून वाद रंगले. कोणत्या संघटनेला मान्यता द्यावी, कोणाचे प्रतिनिधी घ्यावेत येथपासून सुरू झालेले प्रश्न मग नोंदणीचे अर्ज, पद्धत येथपर्यंत सुरू राहिले. त्यातच पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू ठेवल्याने महाराष्ट्र एकता हॉकर्स युनियन न्यायालयात गेली. पालिकेच्या कारवाईविरोधात शरद राव यांच्या मुंबई हॉकर्स युनियननेही आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हे कमी म्हणून की काय पालिकेचे निम्म्याहून अधिक कर्मचारी निवडणुकांच्या कामात अडकल्याने नोंदणीप्रक्रियेला मुहूर्त लवकर मिळण्याची शक्यता नाही.
या सगळ्या गोंधळात स्वत:च्या सदस्यांची नोंदणी नीट होईल का याबाबत संघटनांनाच आता काळजी वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्र हॉकर्स युनियनने स्वतच मुलुंड, भांडुप, घाटकोपर भागातील सदस्य फेरीवाल्यांचे व्हिडियो शूटिंग करून नोंदी ठेवण्यास सुरुवात केली. ‘फेरीवाले संघटनांच्या प्रतिनिधींकडून माहिती घेऊन नोंदणी करण्याचे निर्देश होते. मात्र पालिकेने तयार केलेल्या समितीत अधिकाऱ्यांचाच भरणा अधिक आहे. आता तर या समितीत नगरसेवक वा त्यांचे प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याच माणसांची नोंदणी फेरीवाल्यांमध्ये होऊन आमच्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हीच व्हिडियो शूटिंगद्वारे नोंदणी सुरू केली आहे,’ असे संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
जानेवारीत न्यायालयाच्या निर्देशानुसार चार महिन्यात नोंदणीप्रक्रिया होणे आवश्यक होते. मात्र आता मार्च उलटला तरी काहीच हालचाल नाही. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ानंतर बैठकही झालेली नाही. दरम्यानच्या काळात आम्ही संघटनेकडून फेरीवाल्यांनी नोंदणीही व्हिडियो शुटिंगने पूर्ण केली. आता पालिकेने या नोंदणीलाच मान्यता द्यावी, अशी आमची मागणी आहे, असे महाराष्ट्र हॉकर्स युनियनचे सरचिटणीस शरद इंदुलकर म्हणाले.