पदपथांवरील लाखो विक्रत्यांकडून दररोज वाटल्या जाणाऱ्या कोटय़वधी पिशव्यांना आवर घालण्यात पालिकेला अजूनही यश आलेले नसले तरी दुकाने, मॉलमधून पातळ प्लास्टिक पिशव्या देण्याचे प्रमाण घटल्याचे कारवाईच्या आकडेवारीवरून दिसून येते. दंडाची रक्कम पाच हजार रुपयांवर नेल्याने दुकानदार प्लास्टिक पिशव्यांबाबत जोखीम घेत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. २६ जुलच्या महापुरानंतर प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीबाबत विचार सुरू झाला. याबाबत पालिका व राज्य सरकारने वेळोवेळी बंदीची भाषा केली असली तरी ग्राहकांची मागणी व सोय पाहता विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच ठेवला. पदपथांवर बसणाऱ्या लाखो विक्रेत्यांकडून दिवसभरात कोटय़वधी प्लास्टिक पिशव्या मुंबईकरांच्या हाती सोपवल्या जात असल्या तरी मॉल व दुकानदारांवर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची बंदी अमलात आणण्यात पालिकेला काही प्रमाणात यश आले आहे.
महानगरपालिकेच्या दुकान आणि आस्थापना विभागाने २०१२ मध्ये तब्बल १०,७७३ जणांविरोधात कारवाई केली. त्या वेळी १५,८२४ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून ६८ लाख ६१ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. २०१३ मध्ये २,९८९ जणांविरोधी कारवाई करीत ५,८८२ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या गेल्या व ४१ लाख ५० हजारांचा दंडही आकारण्यात आला. २०१४ मध्ये मात्र पातळ पिशव्या वापरल्याप्रकरणी अवघ्या ८६७ जणांवरच पालिकेचे अधिकारी कारवाई करू शकले. त्यातून अवघ्या ५२१ किलो पिशव्या जप्त झाल्या. मात्र दंडाची रक्कम पाच हजार रुपये केल्याने जमा झालेला दंड तब्बल ३४ लाख ५० हजार रुपये होता.
प्लास्टिक पिशव्यांबाबत पालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईमुळे दुकानांमधून प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झाला आहे. ज्युट, कापडी, तसेच कागदी पिशव्या वापरल्या जातात. तसेच पिशव्यांसाठी पाच ते दहा रुपये आकारले जात असल्याने सर्वच प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांची संख्या दुकानांमधून कमी झाल्याचे दुकान व आस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना वाटते. अर्थात, शहराच्या कोणत्याही लहान-मोठय़ा बाजारात या पिशव्या सर्रास विकल्या जातात. या पिशव्या विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाला नाही. अनुज्ञापन विभाग तसेच वॉर्ड पातळीवर ही कारवाई केली जाते. अनुज्ञापन विभागातील दक्षता खात्यातील कर्मचाऱ्यांनी गेल्याच आठवडय़ात मुलुंड येथे छापा टाकून तब्बल ५२३ किलो वजनाच्या ५० मायक्रॉनपेक्षा पातळ पिशव्यांचा साठा जप्त केला. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला, मात्र या कारवाईंची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढविल्याशिवाय प्लास्टिक पिशव्यांना आळा घातला येणे कठीण आहे.
दुकानांवरील कारवाई
वर्ष कारवाई पिशव्या जप्त – दंड
२०१२ १०,७७३ १५,८२४ किलो ६८ लाख ६१ हजार रुपये
२०१३ २,९८९ ५,८८२ किलो ४१ लाख ५० हजार रुपये
२०१४ ८६७ ५२१ किलो ३४ लाख ५० हजार रुपये
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2015 रोजी प्रकाशित
पदपथांवरील विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
पदपथांवरील लाखो विक्रत्यांकडून दररोज वाटल्या जाणाऱ्या कोटय़वधी पिशव्यांना आवर घालण्यात पालिकेला अजूनही यश आलेले नसले

First published on: 12-05-2015 at 06:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plastic bags use by sidewalk vendors