कायदा हा सर्वासाठी समान असतो याचे दाखले अनेकदा दिले जातात. परंतु, त्याची अंमलबजावणी तशीच होईल हे सांगणे अवघड असते. शहरातील फलकबाजीचा मुद्दा वेळोवेळी डोकावत असतो. फलकबाजीमुळे शहर विद्रुप होत असल्याची ओरड सुरू झाल्यावर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जातो आणि काही दिवसानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. अलीकडे मात्र स्थानिक पोलीस ठाण्यांची परवानगी न घेता फलक उभारणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली. त्यामुळे फलकबाजीला काहीसा आळा बसल्याचे चित्र दिसत असतानाच खासदार आणि पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर उभारण्यात आलेल्या फलकांमुळे पोलिसांची ही मोहीम थंडावली की काय असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
अर्निबध फलक रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्यानंतर या विषयावर पोलीस यंत्रणेने असे फलक उभारणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला.
नाशिकमध्ये फलकबाजीवरून यापूर्वी बरेच राजकीय वादंग निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी याच मुद्यावरून सर्वपक्षीयांच्या बैठकीत खुद्द पालकमंत्र्यांनी कुठेही अनधिकृतपणे फलक लागणार नाही याची प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले होते. परंतु सध्याचे चित्र पाहता पालकमंत्र्यांच्या आदेशाला त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचे दिसते. नाशिकचे खासदार व पालकमंत्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी झळकविलेले फलक त्याची प्रचिती देत आहेत. महापालिकेच्या थंड कारभारामुळे फलकांविरोधात पोलिसांनी लक्ष घातल्याने काहीअंशी चित्र बदलेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने अनधिकृत फलक उभारणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले. गेल्या काही महिन्यांपासून या पद्धतीने फलक उभारणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. परंतु, या कारवाईपासून राष्ट्रवादीच्या वजनदार नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी उभारलेल्या फलकांचा अपवाद करण्यात आला काय, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे.