एका गुन्ह्यात जप्त केलेली कार परत मिळावी आणि जामीनअर्जावर सकारात्मक शेरा द्यावा यासाठी पाच हजारांची लाच घेणा-या पोलीस हवालदारास रंगेहाथ पकडण्यात आले. विजय रखमाजी मंडलिक (बक्कल नं. १८१८) असे लाचखोर हवालदाराचे नाव असून तो तालुका पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहे.
नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक कर्पे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक सारिका अहिरराव, गणेश रेहरे, गणेश पाटील, किशोर सरवटे यांच्या पथकाने काल बसस्थानकात लावलेल्या सापळ्यात लाचेची रक्कम स्वीकारताना मंडलिक अलगद अडकला.
याबाबत चंद्रभान कांगणे (सिन्नर) यांनी फिर्याद दिली होती. कार परत हवी असेल आणि न्यायालयात केलेला जामीनअर्ज मंजूर करून घ्यायचा असेल तर दहा हजारांची मागणी मंडलिक यांनी केली होती. अखेर पाच हजारांवर तडजोड झाली. पैसे घेऊन संगमनेर बसस्थानकावर येण्यास कांगणे यांना बजावण्यात आले होते. त्यानुसार काल पाच हजार रुपये घेऊन कांगणे बसस्थानकात आले. ठरलेल्या ठिकाणी पैशाची देवाण-घेवाण चालू असतानाच लाचलुचपतच्या अधिका-यांनी मंडलिक यास ताब्यात घेतले. अशोक कर्पे यांनी याबाबत स्वत: फिर्याद दिली असून मंगळवारी रात्री मंडलिकला अटकही करण्यात आली.