‘पोपट’ टीमची लोकसत्ता कार्यालयाला भेट
एखादी मनोरंजनात्मक मालिका किंवा चित्रपट करताना त्याबरोबर येणारी जबाबदारीची जाणीवही खूप मोठी असते. आतापर्यंतच्या प्रत्येक ‘प्रोजेक्ट’मध्ये आपण ही जाणीव जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तद्दन गल्लाभरू चित्रपटाला शोभेल असे ‘पोपट’ हे नाव आपण आपल्या चित्रपटाला दिले असले, तरी चित्रपटाचा विषय हसून सोडून देण्यासारखा नाही, असे मत दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी व्यक्त केले.
सतीश राजवाडे यांच्यासह ‘पोपट’मधील मुख्य कलाकारांनी नुकतीच ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी त्याने ‘पोपट’बरोबरच इतरही अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. मिराह एण्टरटेन्मेंट या निर्मिती संस्थेबरोबर सतीश राजवाडेची जोडी चांगलीच जमली आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘प्रेमाची गोष्ट’ या दोन चित्रपटांच्या यशानंतर आता ‘पोपट’ प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. एका गावातील तीन मुले एकत्र येऊन चित्रपट काढायचे ठरवतात. त्यांच्यापैकी एक हौशी अभिनेता असतो, एक दिग्दर्शक आणि लेखक असतो, एकाकडे पैसे असतात. पण या तिघांकडे नसतो, तो कॅमेरा. तेव्हा त्यांना त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असा चौथा मित्र येऊन भेटतो आणि ‘पोपट’ची कथा वेगळी वळणे घेते, असे चित्रपटाबाबत बोलताना राजवाडे यांनी सांगितले.
चित्रपट असो किंवा मालिका, आपण आपल्या कलाकृतींमधून काही तरी सकस संदेश देण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. याबाबत राजकुमार हिरानी हा आपला आदर्श आहे. त्यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘थ्री इडियट्स’ वगैरे आपल्या चित्रपटांमधून मनोरंजन आणि लोकशिक्षण याची यशस्वी कॅप्सुल तयार करून लोकांसमोर ठेवली. आपणही आपल्या चित्रपटातूंन तसेच करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
या चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत अतुल कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी, ही भूमिका आपल्याला मनाने पुन्हा एकदा तरुण करणारी होती, असे सांगितले. आपल्याबरोबर काम करणारे अमेय, सिद्धार्थ आणि केतन हे तीघेही ऊर्जेचा स्रोत आहेत. त्यांच्यासह काम करताना खूप दमछाक व्हायची. पण या तरुणांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला खूप भावतो, असेही कुलकर्णी म्हणाले. केतन पवार, अमेय वाघ आणि सिद्धार्थ मेनन यांनीही सतीश राजवाडे आणि अतुल कुलकर्णी यांच्यासह काम करण्याचा आपला अनुभव सांगितला. तसेच प्रायोगिक रंगभूमीकडे ‘स्टेपिंग स्टोन’ म्हणून बघण्यात काहीच गैर नाही. आम्ही तिथेच आमच्या मनातला आविष्कार सादर करू शकतो, असे सांगत अमेयने प्रायोगिक रंगभूमीच्या विविध अंगांबद्दल आपले मत व्यक्त केले. यापुढे जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा प्रायोगिक रंगभूमीवर आपली कला सादर करत राहणार, अशी पुष्टी सिद्धार्थने जोडली. तर केतनने तेच एक अभिव्यक्तीचे माध्यम आमच्या हाती असल्याचे सांगितले.
मराठी चित्रपटांची तिकिटे ‘टॅक्स फ्री’च्या नावाखाली १०० रुपयांच्या आत विकण्यावर सतीशने टीका केली. मराठी चित्रपटांना करसवलत दिली पाहिजे. मात्र त्यांच्या तिकिटांचे दरही १५०-२०० रुपये असावेत. आज मराठी माणूस तेवढे पैसे खर्च करून एखादा हिंदी चित्रपट पाहायला जाऊ शकतो, मग मराठी चित्रपटांचे तिकीट एवढे कमी का, असा प्रश्न त्याने विचारला. मराठी निर्माते सुदृढ झाले नाहीत, तर मराठी चित्रपटसृष्टीही सुदृढ होणार नाही. त्यासाठी हा तिकिटांच्या दरांचा प्रश्न निकाली लावायला हवा, असे मतही राजवाडे यांनी व्यक्त केले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2013 रोजी प्रकाशित
पोपट ‘गल्लाभरू’ नाही तर गंभीर!
‘पोपट’ टीमची लोकसत्ता कार्यालयाला भेट एखादी मनोरंजनात्मक मालिका किंवा चित्रपट करताना त्याबरोबर येणारी जबाबदारीची जाणीवही खूप मोठी असते. आतापर्यंतच्या प्रत्येक ‘प्रोजेक्ट’मध्ये आपण ही जाणीव जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.
First published on: 23-08-2013 at 09:08 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popat the marathi movie is on serious issues