उरण तालुक्यातील नौदलाच्या शस्त्रागारासाठी सुरक्षा पट्टय़ासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून या परिसराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र सव्र्हे विभागाकडून येथील जमीनधारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सर्वेक्षण केले जात असल्याचा आक्षेप घेत येथील नागरिकांनी हनुमान कोळीवाडा येथील पेट्रोल पंपाजवळ तीन तासांचे आंदोलन केले. या वेळी उरणच्या तहसीलदारांना न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण होत नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून देत सव्र्हेचे काम बंद करण्याची मागणी करणारे निवेदन दिल्याने सव्र्हे विभागाने पंचनामा करून सव्र्हेचे काम तात्पुरते स्थागित केले.
करंजा येथील शस्त्रागाराच्या सुरक्षेसाठी सुरक्षा पट्टय़ासाठी नौदलाच्या आतील कामाच्या ठिकाणापासून ९१४ मीटरचे अंतर मोजणीचे आदेश न्यायालयाने दिल्याचा दावा नौदल परिसरातील घर व जमिनी बचाव समितीने केला आहे. नौदल, तहसीलदार तसेच संबंधित सिटी सव्र्हे अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून नौदलाच्या शेवटच्या भिंतीपासून अंतर मोजण्यास सुरुवात केल्याने यामध्ये उरण शहराचा संपूर्ण परिसर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या परिसराचा पूर्वीच्या अधिसूचनेतील सव्र्हे नंबरमध्ये समावेश नसल्याने अशा जमीनधारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सव्र्हे केला जात असल्याने विरोध असल्याची समिती तसेच येथील नागरिकांनी भूमिका मांडत सव्र्हे थांबविण्याची मागणी केली होती.
या वेळी समितीचे अध्यक्ष महेश म्हात्रे, सचिव संतोष पवार, गोपाळ पाटील, अॅड. पराग म्हात्रे, सीमा घरत तसेच विविध पक्षांचे नेते तसेच कार्यकर्ते यांनी या संदर्भात आपल्या भूमिका स्पष्ट केल्या.
संग्रहित लेख, दिनांक 28th May 2014 रोजी प्रकाशित
नौदलाच्या सुरक्षा पट्टय़ासाठीच्या सर्वेक्षणाला नागरिकांचा विरोध
उरण तालुक्यातील नौदलाच्या शस्त्रागारासाठी सुरक्षा पट्टय़ासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून या परिसराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
First published on: 28-05-2014 at 07:04 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against navys protection zone in uran