अडतिया संघाचे अध्यक्ष शेख हुसेन यांचा इशारा
कॉटेन मार्केटमधील भाजी बाजारातील परवानाधारक अडतिया आणि भाजी विक्रेते कळमनामध्ये स्थानांतरित झाले असल्याचा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महापालिका प्रशासनाचा दावा अडतिया संघाने फेटाळला. कॉटेन मार्केटमध्ये आजही दीडशेपेक्षा अधिक अडतिया आणि भाजी विक्रेते ठाण मांडून बसले असून हा बाजार हटणार नाही, असा इशारा देत लवकरच या विरोधात आंदोलन करण्यात असा इशारा अडतिया संघाचे अध्यक्ष शेख हुसेन यांनी दिला.
हा भाजी बाजार कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर स्थलांतरित करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर काही परवानाधारक भाजी विक्रेत्यांनी कॉटेन मार्केटमधून आपले बस्तान हलविले असले तरी बाजारात किरकोळ भाजी विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी दिसून आली. आजही बाजारावर फारसा परिणाम दिसून आला नाही. मोठय़ा प्रमाणात बाहेरून भाज्यांचे ट्रक आले असून भाज्यांची विक्री सुरू होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या भाजी बाजाराला उपबाजाराचा दर्जा दिला आहे. लाखोंची उलाढाल असलेल्या या बाजारातून ४० ते ५० हजार लोकांना रोजगार मिळत आहे. कळमनामध्ये खरेदी केलेला माल जात आहे आणि शेतक ऱ्यांचा माल कॉटेन मार्केटमध्येच आहे.
बाजार समितीच्या भूलथापांना बळी पडून बाजारातून कळमन्यात गेलेले विक्रेते आणि आडतिया काही दिवसात बाजारात परत येतील. शेतकरी कळमन्यामध्ये माल विकण्यास उत्सुक नाही मात्र, महापालिका प्रशासन त्यांचे ट्रक नाक्यावर अडवून ते कळमान्याला पाठवितात. पार्किंग व अन्य स्वरूपात महापालिकेला एक कोटी आणि सेसच्या स्वरूपात कळमना बाजार समितीकडे वर्षांला एक कोटी जमा होतात. स्वच्छता आणि पायाभूत सुविधांकडे दोघांचे दुर्लक्ष आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात दोन ते तीन बाजार असताना नागपुरात दोन बाजार का नाही? असा सवाल हुसेन यांनी उपस्थित केला. या बाजारात २७२ परवानाधारक आहेत.
१०० विक्रेत्यांकडे परवाना नाही. महापालिकेने कळमनामध्ये नव्याने अडतिया आणि भाजी विक्रेत्यांना परवाने दिले मात्र त्यांचे नूतनीकरण केले नाही, असा आरोप हुसेन यांनी केला. कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजी विक्रेत्यांची फसवणूक केली असून कळमनामध्ये भाजी विक्रेत्यांना गाळे उपलब्ध करून देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैसे घेतले आहेत, त्यामुळे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बाजार हटणार नाही
कॉटेन मार्केट भाजी बाजारात ९ एकर परिसरात संकुल बांधण्याची घोषणा महापालिकेतर्फे करण्यात आली होती. १९९७ मध्ये स्थायी समितीमध्ये आणि सभागृहात तो प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी लाखो रुपये महापालिकेकडे जमा केले. या ठिकाणी २३८ दुकाने बांधली जाणार होती. शिवाय पार्किंग, कार्यालय आणि सभागृह तयार करण्यात येणार होते. गेल्या दहा वर्षांत केवळ नकाशा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि विकास कामेही झालेली नाहीत. बाजार परिसरात रस्ते तयार करण्यात आले नाहीत, त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी आहे. भाजी विक्रेत्यांना आणि ग्राहकांना पावसाळ्यात चिखलातून जावे लागत आहे. सगळीकडे घाण असून महापालिकेचे दुर्लक्ष आहे. एम्प्रेस सिटीमुळे कॉटेन मार्केटमधील भाजी बाजार हटवून तो कळमाना नेण्यात यावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार सुनील केदार प्रयत्न करीत आहेत, असा आरोप केला. भाजी बाजार बंद केला तर हजारो युवक बेरोजगार होतील. भाजप नेते आणि महापालिका प्रशासनाचा डाव आम्ही हाणून पाडू असा विश्वास व्यक्त करताना प्रसंगी न्यायालयात जावे लागेल तरी चालेल, मात्र हा बाजार हटणार नाही, असा इशारा शेख हुसेन यांनी दिला.