सार्वजनिक ग्रंथालयाला ज्ञान प्रसाराची फार मोठी परंपरा आहे. हे ज्ञान पुस्तकात बंद न राहता बदलत्या आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचा उपयोग करून हे ज्ञान सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन राज्याचे माजी ग्रंथालय संचालक गणेश तायडे यांनी प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित तालुका ग्रंथालय मेळाव्यात बोलतांना केले.
 मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रगती वाचनालयाच्या अध्यक्षा अरुणाताई कुल्ली होत्या. मेळाव्याला जिल्हा ग्रंथालयाचे सतीश जाधव व नेमिनाथ सातपुते यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सुनील वायाळ व स्नेहाताई टापरे प्रामुख्याने उपस्थित होते. या निमित्ताने प्रगती वाचनालयाने नव्याने खरेदी केलेल्या दर्जेदार वाड्मयीन पुस्तकाचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. याचा शहरातील नागरिकांनी व वाचकांनी मोठय़ा प्रमाणात लाभ घेतला. यासोबतच २०१२-१३ मध्ये शासनाने काही ग्रंथालय व कार्यकर्त्यांचा ग्रंथमित्र पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यात गजानन डोंगरकार, नांदुरा, बबनराव आखरे, ज्ञानेश्वर ढगे, खामगाव, नामदेवराव वानखेडे, बुलढाणा यांचा समावेश होता. त्यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
 याप्रसंगी बोलतांना गणेश तायडे यांनी ग्रंथालयांसमोर असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकून येणाऱ्या काळात ग्रंथालयाने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक लोकाभिमुख चळवळ करावी, असे मत व्यक्त केले, तसेच जिल्हा ग्रंथपाल सतीश जाधव यांनी वाढत्या प्रसार माध्यमांमुळे कमी होणाऱ्या वाचक संख्येवर खेद व्यक्त करून वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षांसारखे उपक्रम राबवून अभ्यासिकांचे आयोजन करावे, असे सांगितले. नेमीनाथ सातपुते यांनी ग्रामीण भागापर्यंत ग्रंथालय चळवळ येण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांनी साखळी योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करावा, असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे ग्रंथालय चळवळीत महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने महिलांनी बचत गटाच्या माध्यमांतून व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रंथांचे वितरण महिलांना करावे, जेणेकरून महिला ग्रंथालयाकडे वळतील यासाठी प्रयत्न करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. कि.वा.वाघ यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रगती वाचनालयाचे गं्रथपाल पंजाबराव गायकवाड यांनी मानले. या मेळाव्याला बुलढाणा तालुक्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.