महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा २२ व २३ मार्च रोजी अकोल्यात दौरा होणार असल्याची माहिती जिल्हा संपर्क अध्यक्ष प्रा. सुधाकर तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष विजय मालोकार, नगरसेवक राजेश काळे व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्रा. सुधाकर तांबोळी यांनी दिली. पक्ष संघटन बळकट करणे व येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची तयारी करणे, या उद्देशाने हा दौरा आहे. दौऱ्यासाठी जिल्ह्य़ाची आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याची माहिती प्रा.तांबोळी यांनी दिली. या दौऱ्यात २२ मार्चला राज ठाकरे सकाळी शेगावला संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर ते बाळापूर मार्गे अकोल्याला येणार आहेत. अकोला शहराच्या सुरुवातीला असलेल्या बाळापूर नाका परिसरात त्यांचे मनसेच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमार्फत एकत्रित स्वागत करण्यात येईल. २२ मार्चला केवळ निमंत्रित, प्रतिष्ठित व्यक्तींसोबत राज ठाकरे यांची नियोजित चर्चा आहे. २३ मार्च रोजी कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद जसनागरा हॉटेलमध्ये होणार आहे. या संवादात अकोला जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे त्यांची चर्चा होणार आहे. त्यानंतर जिल्हा व तालुका मनसे पदाधिकाऱ्यांशी संयुक्त चर्चा होईल. या दौऱ्यात मनसे आमदार, सरचिटणीस व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याचे प्रा.तांबोळी म्हणाले. २३ मार्च रोजी सायंकाळी अमरावतीकडे राज ठाकरे रवाना होतील. २४ मार्च रोजी अमरावतीत होणाऱ्या जाहीरसभेसाठी चौदा ते पंधरा हजार कार्यकर्ते अकोल्यातून सहभागी होतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष विजय मालोकार यांनी दिली.