पावसाअभावी जिल्ह्य़ातील ६० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. नागपूर जिल्ह्य़ात कालपर्यंत १ लाख ७८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. ही टक्केवारी ३५ टक्के आहे. त्यात ७३ हजार ६०९ हेक्टरवर कापूस, ३८ हजार ६२० हेक्टरवर सोयाबीन, १२ हजार ९५५ हेक्टरवर धान पेरणी झाली. सर्वसाधारणपणे संपूर्ण पावसाळ्यात १ हजार २०५ मि.मी. पाऊस पडतो. आतापर्यंत फक्त ८९.७० मि.मी. पाऊस पडला. जूनमध्ये २५१.६९ टक्के पाऊस पडायला हवा होता. गेल्या वर्षी जूनमध्ये ४०० मि.मी. पाऊस पडला होता. आतापर्यंत जिल्ह्य़ातील काही भागात १०० मि.मी.वर पाऊस पडला, परंतु अधिकांश भागात तो कमीच आहे. सोयाबीनसारख्या पिकाला १०० मि.मी. पावसाची गरज आहे, परंतु तेवढा पाऊस पडला नाही. पहिला पाऊस १३ जूनला पडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. नंतर पावसाने ओढ दिली. जेथे पाऊस चांगला पडला तेथील परिस्थिती बरी आहे, परंतु आतापर्यंत १०० मि.मी. पर्यंत पाऊस न पडलेल्या भागातील ६० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी जिल्ह्य़ात पाऊस आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली, परंतु पुढील दोन-तीन दिवसांत पाऊस आला नाही, तर ही पिकेही वाया जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पावसाचे प्रमाण बघून पेरणी करावी. यात कमी पावसात येणाऱ्या पिकांचा समावेश करावा, असा सल्ला जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एस. बी. मोहरील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.
गेल्या वर्षी रब्बी पिके हाताशी येताच गारपीट झाली. या दोन्ही हंगामासाठी काढलेले कर्ज शेतकरी परत करू शकलेले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी गेल्या. जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज दिले जाते, परंतु ही बँकच डबघाईस आल्याने शेतकरी कर्जापासून वंचित राहिले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढून पेरण्या कराव्या लागल्या.
जूनमध्ये पेरणी झाल्यास सप्टेंबरच्या शेवटी सोयाबीनची काढणी केली जाते. ओलिताची सोय असल्यास हीच शेतजमीन पुन्हा तयार करून हरभरा, गहू, ही पिके घेतली जातात. जिल्ह्य़ात आतापर्यंत ३५ टक्के पेरणी झाली असून त्यात ५४ टक्के कापूस, २२ टक्के सोयाबीन आणि २१ टक्के धानाची पेरणी झाली आहे. सोयाबीनला कमी पाण्याची आवश्यकता असली तरी आतापर्यंत १०० मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. ज्या भागात १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला तेथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. हीच स्थिती कापसाची आहे. खरीप हंगामाची पेरणी जूनमध्ये झाली पाहिजे, परंतु जून संपला. त्यामुळे जुलैमध्ये पेरणी झाल्यास व योग्य तेवढा पाऊस पडला तरी उत्पन्नात सरासरी २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता असते, असे कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ सुभाष पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सल्ला : सध्याच्या पावसाची स्थिती बघता लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी, पेरणी करताना बियाण्यांची मात्रा १५ ते २० टक्क्यांनी वाढवावी, आंतरपीक पद्धतीचा वापर करावा, ८ ते १५ जुलैदरम्यान पावसाचे आगमन झाल्यास शेतकऱ्यांनी कापूस, धान, संकरित ज्वारी, सोयाबीन, तूर, तीळ आणि सूर्यफूल ही पिके घ्यावीत, या कालवाधीत भूईमूग, मूग, उडीद या पिकांची लागवड करू नये, तसेच १६ जुलै ते ३१ जुलै या दरम्यान पाऊस आल्यास संकरित ज्वारी, सूर्यफुल, तूर आणि सोयाबीन, बाजरी आणि तूर, एरंडी आणि तीळ ही पिके घ्यावी, असा सल्लाही सुभाष पाटील यांनी दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2014 रोजी प्रकाशित
नागपूर जिल्ह्य़ातील ६० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
पावसाअभावी जिल्ह्य़ातील ६० टक्के शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.

First published on: 08-07-2014 at 07:39 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Re planting crisis on 60percent farmers