महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावरील नव्या सदस्यांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अध्यक्षपदासाठी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. गो. मा. पवार व अन्य काही नावे चर्चेत आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी प्रदीर्घकाळ भूषविल्यानंतर गेल्या १७ ऑगस्ट रोजी ते अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. अन्य सदस्यांची कारकीर्दही त्याबरोबरच संपल्यानंतर मंडळासाठी नवा अध्यक्ष नियुक्त करण्याची प्रक्रिया मराठी भाषा विभागाने सुरू केली असून त्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यापूर्वी कर्णिक यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे चार नावांची शिफारस केली होती. त्यात डॉ. कोत्तापल्ले यांच्यासह गो. मा. पवार, वसंत आबाजी डहाके तसेच ज्येष्ठ कथाकार भारत सासणे आदींचा समावेश आहे, असे कळते. डॉ. कोत्तापल्ले यांच्यावर भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहेच. पण ते मंडळाचे अध्यक्ष होण्यासही इच्छूक असल्याचे समजते. कर्णिक यांच्या अध्यक्षतेखालील मंडळात ते सदस्य म्हणून कार्यरत होते. शिवाय मंडळाच्या कामकाजात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. मंडळाची नव्याने पुनर्रचना करताना आधीच्या मंडळातील काही तसेच काही नव्या सदस्यांना सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. राजकीय पातळीवर मंत्री तसेच आमदारांकडून मुख्यमंत्र्यांकडे अनेक नावांची शिफारस झाली असून येत्या काही दिवसांत हा विषय निकाली काढण्याचा संबंधित विभागाचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात आले.