टोल दरातील वाढीविषयी चिंता व्यक्त करण्यात येऊन ही वाढ रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव येथे महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत संमत करण्यात आला.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता स्पर्धा अभियानाच्या निमित्ताने आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार ही ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामस्वच्छतेच्या मूळ संकल्पनेच्या पाश्र्वभूमीवर आयोजित या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विधायक सूचना केल्या. मुंबई-आग्रा महामार्गावर गावाजवळ असलेल्या टोल नाक्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
या वाढीविषयी ग्रामस्थांनी चिंता व्यक्त करून वाढ रद्द करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या सूचनांची दखल घेण्यात आली.
ज्येष्ठ सदस्य भास्कर बनकर यांनी ग्रामविकास व ग्रामस्वच्छता अभियान राबविताना ग्रामस्थांचा सहभाग व सहकार्य महत्त्वाचे असून ग्रामस्थांच्या सहभागातून विकास साधला जाणार आहे, असे नमूद केले. आगामी दोन महिन्यांत शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या निफाड फाटा परिसराचे सुशोभीकरण हाती घेण्यात येईल, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या पुतळ्याशेजारी महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्याचे आश्वासन दिले.
डासांची उत्पत्ती थांबविणे, आरोग्य व स्वच्छतेची काळजी म्हणून शहरातील खासगी आणि सार्वजनिक शौचालयांच्या पाइपला ग्रामपंचायतीच्या वतीने जाळीच्या टोप्या बसविण्यात येतील असेही त्यांनी नमूद केले.
सामाजिक कार्यकर्ते जयंत मुथा यांनी गावात गुटखा व तंबाखू बंदी यशस्वी करावी तसेच शंभर टक्के हगणदारी मुक्तीसाठी सार्वजनिक प्रयत्न व्हावेत अशा सूचना केल्या. बापूसाहेब पाटील यांनी चिचखेडा चौफुलीचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना करत या ठिकाणी भुयारी मार्गासाठी खोदलेल्या खड्डय़ात चार-पाच महिन्यांपासून पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती झाल्याची शक्यता असून हेच पाणी परिसरातील कूपनलिकेत उतरून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली.
प्रकाश गोसावी यांनी उंबरखेड रस्ता परिसरातील उपनगर भागात बहुउद्देशीय सभागृह बांधण्याची तर, प्रशांत घोडके यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या सव्‍‌र्हिस रस्त्यावर पथदीप लावण्याची मागणी केली. महेंद्र साळवे यांनी निफाड रस्ता परिसरातील गटारी स्वच्छ करण्याची सूचना केली.सभेस उपस्थित अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजना, सवलती, अनुदान आदींची सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामविकास अधिकारी बापू अहिरे यांनी ग्राहकांनी मांडलेल्या सूचनांची नोंद केली. सरपंच महेंद्र गांगुर्डे यांनी ग्रामस्थांच्या सूचनांची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपसरपंच संजय मोरे हेही उपस्थित होते.