‘छापा-काटा’च्या पहिल्या रांगेतील तिकिटांसाठी ‘तमाशा’
‘हे थिएटर आमचे आहे, सेन्सॉर बोर्डही आमचेच आहे, तुम्ही कोण?’ ‘आम्हाला पहिल्या रांगेतीलच जागा हव्यात, अन्यथा बघून घेऊ’ अशा शब्दांत महसूल अधिकाऱ्यांनी एका नाटय़ निर्मात्यास रविवारी ठाण्यात दमबाजी केली. स्वत:ला सेन्सॉरचे सदस्य म्हणविणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या दबंगगिरीचे नाटय़क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले असून संबंधितांनी जाहीर माफी न मागितल्यास ठाण्यातील नाटय़प्रयोग थांबविण्याचा इशारा नाटय़ निर्माता संघाने दिला आहे.
मुक्ता बर्वे आणि दिनेश पेम्डणेकर यांच्या ‘छापा काटा’ या नाटकाचा प्रयोग रविवारी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात पार पडला. त्यापूर्वी अधिकाऱ्यांच्या दबंगगिरीचा हा प्रयोग नाटय़रसिकांनाही फुकट पाहयला मिळाला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील बी. के. गवळी या अधिकाऱ्याने शनिवारी घाणेकर नाटय़गृहात फोन करून आपण सेन्सॉरचे सदस्य असून ‘छापा काटा’ची तीन तिकीटे राखून ठेवण्याचे फर्मान सोडले. त्यावर, ‘सेन्सॉरच्या दोन जागा असून आपण ओळखपत्र घेऊन या’, असे उत्तर तेथील माहिला कर्मचाऱ्याने दिले. त्यावर ‘ओळखपत्र कसले मागता, जागा राखून ठेवा नाहीतर बघून घेऊ’, अशी दमदाटी या अधिकाऱ्याने केली.
रविवारी नाटय़प्रयोग सुरू होण्यापूर्वी गवळी विभागीय उपायुक्त दिलीप शिंदे यांच्यासमवेत नाटय़गृहात आले. त्यावेळीही गवळी यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालीत दमबाजी केली. एवढेच नव्हे तर ‘हे नाटय़गृह आमचे आहे. सेन्सॉर बोर्डही आमचेच आहे. तुम्ही कोण?’ अशी विचारणा करीत पहिल्या रांगेतीलच तिकिटे पाहिजेत, असा हट्ट धरला. त्यावर, ‘मी नाटकाचा निर्माता आहे. थिएटर तुमचे असले तरी मी भाडय़ाने घेतले आहे.’ असे उत्तर सुनावल्यावर तणतणतच हे अधिकारी नाटक पाहण्यासाठी गेले, असे या नाटकाचे निर्माते दिनेश पेडणेकर यांनी सांगितले. गवळी यांनी आधी फोनवर आणि नंतर सर्वासमक्ष आपल्या सहकाऱ्यांना दमबाजी केल्याचा आरोपही त्यांनी केला. नाटय़निर्माता संघाचे सरचिटणीस दिलीप जाधव यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करीत महिला कर्मचाऱ्यांना दमबाजी करणे गंभीर असून घडल्या प्रकाराबद्दल सदर अधिकाऱ्यांनी माफी मागावी, अन्यथा ठाण्यातील दोन्ही नाटय़गृहातील प्रयोग थांबवू, असा इशारा दिला आहे.
याबाबत गवळी यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. तर आपल्या समोर तरी असा काही प्रकार घडलेला नसल्याचे विभागीय उपायुक्त दिलीप शिंदे यांनी सांगितले. तरीही गवळी हे नाटय़निर्मात्यांशी काही चुकीचे वागले असतील तर त्यांना समज दिली जाईल आणि निर्मात्यांचा गैरसमज दूर केला जाईल असेही शिंदे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2014 रोजी प्रकाशित
सेन्सॉरच्या नावाने नाटय़प्रयोगात महसूल अधिकाऱ्यांची दबंगगिरी
‘हे थिएटर आमचे आहे, सेन्सॉर बोर्डही आमचेच आहे, तुम्ही कोण?’ ‘आम्हाला पहिल्या रांगेतीलच जागा हव्यात, अन्यथा बघून घेऊ’ अशा शब्दांत महसूल अधिकाऱ्यांनी एका नाटय़ निर्मात्यास रविवारी ठाण्यात दमबाजी केली.
First published on: 30-04-2014 at 08:39 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revenue officials rude behavior