यवतमाळ विधानसभेच्या रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी नीलेश पारवेकर यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार मदन येरावार यांचा १५ हजार २२३ मतांनी पराभव केला. नंदिनी पारवेकर यांना ६२ हजार ५०९ तर मदन येरावार यांना ४२ हजार २७६ मते मिळाली.
या निवडणुकीत ३ लाख २० हजार ५२१ नागरिकांना मताधिकार होता. पैकी फक्त १ लाख १७ हजार ५१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी केवळ ३६.५७ होती. एवढे कमी मतदान होऊनही काँग्रेसच्या नंदिनी पारवेकरांनी १५ हजारांच्या वर मताधिक्क्याने विजय मिळवला याचा अर्थ जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाला पसंती दिली आणि आरपीआयच्या गवई-कवाडे गाटाच्या आवाहनाचे समर्थन केले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, निवडणूक प्रचार प्रमुख मंत्री शिवाजीराव मोघे, मंत्री मनोहर नाईक, आमदार संदीप बाजोरिया यांनी व्यक्त केली. या निवडणुकीत उभ्या असलेल्या इतर आठ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. उर्वरित उमेदवारांमध्ये जास्त मते मिळवणाऱ्यात हरिदास मेश्राम, ३१२९ यांचा समावेश असून त्याखालोखाल उत्तम कांबळे १२१०, मनीष ढाले ९८९, शेख हबीब शेख वजीर ६७१, माधुरी अंजीकर ५५९, विठ्ठल धानोरकर ६७१, श्रीकांत धोटे २४०, मधुकर निस्ताने २६५ अशी मते मिळाली आहेत.
अत्यंत कमी मतदान होऊनही नंदिनी पारवेकर यांना त्यांचे पती नीलेश पारवेकरांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. २००९ च्या निवडणुकीतच नीलेश पारवेकरांना ५६ हजार १८७ मते मिळाली होती, तर या पोटनिवडणुकीत नंदिनी पारवेकरांना ६२ हजार ५०९ मते मिळाली आहेत. मदन येरावार यांना मागच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपैकी जास्त मते मिळाली आहेत.
गेल्यावेळी येरावार यांना ३६ हजार ३७३ मते होती, तर यावेळी ४२ हजार २७६ मते मिळाली आहेत. गेल्यावेळी १ लाख ६२ हजार ५०८ एवढे मतदान झाले होते. यंदा मात्र त्यापेक्षा कमी १ लाख १७ हजार ५१९ एवढे मतदान झाले. गेल्यावेळी बाळासाहेब चौधरी यांना २६ हजार १६३ मते, चंद्रकांत गाडे पाटील यांना १८ हजार ६२२, राजेंद्र महाडोळे यांना ९ हजार २७६ या तीन अपक्ष उमेदवारांनी अनामत वाचवली होती, तर यावेळी मदन येरावार वगळता एकही उमेदवार अनामत वाचवू शकला नाही.
गेल्यावेळी तर माणिकताई पांडे यांनी उमेदवारी मागे घेतल्याची पत्रके काढली होती. मला मतदान करू नका, असे जाहीर केले होते. तरीही त्यांना १३८८ मते मिळाली  होती. इलेक्ट्रॉनिक मशिनने मतदान झाल्यामुळे एकही मत अवैध ठरले नाही. काँग्रेसच्या नंदिनी पारवेकरांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइंच्या कवाडे, गवई गटांचा पाठिंबा होता, तर भाजपच्या उमेदवाराला शिवसेना आणि रिपाइंच्या आठवले गटाचा पाठिंबाही होता.
मागच्या निवडणुकीत अपक्ष लढलेल्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत गाडे पाटील यांची यावेळी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने हकालपट्टी करण्यापूर्वी गाडे पाटील भाजपमध्ये गेले. त्यांना १८ हजार ६२२ मते २००९ मध्ये मिळाली होती. भाजपला आकाश ठेंगणे झाले होते, पण मतदारांनी गाडे पाटलांच्या भागात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे.