सोमवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने सामान्यांची दैनंदिनी विस्कळीत करण्याबरोबरच शाळेतील उपस्थितीवरही गंभीर परिणाम केला. मंगळवारी दिवसा आणि बुधवारी पहाटेपर्यंत झालेल्या पावसाने लोकांची अग्निपरीक्षा घेतली. वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने लोकांनी सकाळी घरांमधील पाणी बाहेर काढण्यास आणि अस्ताव्यस्त झालेले सामान आवरण्यास सुरुवात केली. पावसाचा फटका शहरातील शेकडो वस्त्यांना बसला. विशेषत: नागनदी, पिवळी नदी आणि नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांचे जीवन प्रभावित झाले.
अनेक वस्त्यातील शाळांमध्ये मंगळवारी रात्री आजूबाजूच्या वस्त्यांमधील लोकांनी आश्रय घेतला होता. सदर, मंगळवारी, गिट्टीखदान, राणी दुर्गावतीनगर, पंचशीलनगरात जवळच असलेल्या चांभार नाल्यात अक्षरश: लोकांचे पाण्याचे हंडे, डबे, सायकली, कपडे आणि बारीकसुरीक सामान वाहून गेले. रात्रीच्या पावसाने जबर धास्ती बसलेल्या लोकांनी आधी लहान मुलांना घरातून हलवून त्यांना सुरक्षित ठिकाणी, नातेवाईकांकडे पाठवून दिले. रात्री उशिरापर्यंत जेवढय़ा वस्तुंची, घरातील सामानांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांनी पाण्याच्या जोर वाढल्यामुळे सामान तेथेच ठेवून मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. राणी दुर्गावतीनगरातील कमल सेवारे यांचे बरेच सामान चांभार नाल्यात वाहून गेले. त्या भागातील अनेक नागरिकांनी नगरसेवकाला विनंती केल्याने त्यांच्यासाठी शाळा उघडी करून देण्यात आली. लोकांना त्याचा फायदा झाला. सकाळी घरातील पाण्याचा उपसा करण्यासाठी मोटार मागवून आणली मात्र, पाण्याचा उपसा करूनही पाणी जाण्यासाठी वाटच नसल्याने बाहेर काढलेले पाणी पुन्हा घरातच जमा होत असल्याचे सेवारे म्हणाल्या.
लोणाऱ्याच्या राजश्री राजीव थोरात रात्री ११ वाजता त्यांच्या यजमानांना घेण्यासाठी नागपुरातील रहाटे कॉलनीतील बस थांब्यावर कार घेऊन आल्या. दोन्ही बाजूंचे रस्ते पाण्याने तुडूंब भरलेले. रस्ता सापडत नव्हता. एका अ‍ॅक्टिवावर असलेले एक दाम्पत्य पाण्यात वाहून जात असताना त्यांना कारमध्ये घेतले आणि सदरच्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी नेऊन सोडले. लोणारा मार्गावर चारचाकी गाडय़ा पाण्यावर तरंगताना थोरात दाम्प्याने पाहिल्या. पोहोचेपर्यंत जीव मुठीत धरून कार ड्राईव्ह करीत रात्री दीड वाजता कसेबसे ते घरी पोहोचले.
विहिरी तुडंब भरल्याने रात्रभर पाण्यात मोटारी बुडून होत्या. सकाळी मोटारची तपासणी करायला गेलेल्या लोकांना करंट बसल्याचे दिघोरीत राहणाऱ्या नंदा बागडे यांनी सांगितले. पाण्यात मोटार बुडाल्याने लोक सावध होते. त्यामुळे गंभीर इजा कोणाला झाली नाही. बागडे यांच्या घरी आणि शेजारच्या तीन घरात करंट बसल्याचे त्या म्हणाल्या. सिटी सव्‍‌र्हे कार्यालयात काम करणाऱ्या गीतांजली तिजारे म्हणाल्या, आम्ही गरजू लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढी केली. बाजूला भिंत पडली. जीवित हानी झाली नसली तरी लोकांचे आर्थिक नुकसान भयंकर झाले आहे. सकाळी मुले शाळेत न जाता घरातील पाणी उपसण्याच्या कामात आईवडिलांना मदत करत होती. सिम्स हॉस्पिटलमधील प्रणिता यांच्या तळमजल्यातील घरात पाण्याचेच साम्राज्य होते. त्या प्रचंड घाबरल्या होत्या आणि मदतीसाठी विनवणी करीत होत्या. बालाजीनगरातील नागरिकांनाही पावसाच्या रौद्र रूपाचा सामना करावा लागला.
अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांनी घरांना कुलूप लावून दुसरीकडे जाणे पसंत केले. बर्डीतील बीग बाजारातील बेसमेंटमध्ये संपूर्ण पाणी जमा झाल्याने जनरेटर बंद पडले. त्याचबरोबर बीग बाजारातील सर्व सिस्टिम बंद पडल्याने त्याठिकाणची देवाणघेवाण थांबली. अनेक मोठय़ा इमारतींच्या तळमजल्यात असलेल्या वाहनतळातील गाडय़ा रात्रभर पाण्यात बुडून असल्याने सकाळी त्यांना काढणे मुश्किल झाले. रस्त्यावरील अनेक गाडय़ा चिखलात रुतून
बसल्या होत्या.