‘माझ्या आयुष्यात प्रेम नाही म्हणून असेल कदाचित, पण माझ्या मनात प्रेमाविषयी बोलण्यासारख्या, सांगण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की मला प्रेमपट करायला खूप आवडतात’, दिग्दर्शक म्हणून आपल्या शैलीविषयी इतक्या मनमोक ळेपणाने बोलणारा अवलिया विरळा. त्यांच्या मनातलं प्रेम इतकं भव्य होऊन रूपेरी पडद्यावर उतरतं की मग प्रेमातली ‘खामोशी’सुध्दा म्युझिकल होऊन जाते. आजूबाजूला कितीही ‘ब्लॅक’ वातावरण असलं तरी त्यातून प्रेमाचा शुभ्र किरण आपल्याला दिसल्याशिवाय रहात नाही. ‘हम दिल दे चुके सनम’ हे म्हणतानाही प्रेमातलं हरून जिंकणं आपल्याला नव्याने कळतं. ‘देवदास’ नव्याने पहावासा वाटतो..‘साँवरिया’ गुणगुणत रहावंसं वाटतं. काल्पनिक असली तरी प्रेमाची ही जादुई दुनिया कायम पहायला मिळावी ही ‘गुजारिश’ करणार आपण एवढय़ात ‘रावडी राठोड’ची निर्मिती संजय लीला भन्साळींनी केली आहे असं कळतं आणि आपल्याला अचंबित व्हायला होतं. त्यात काय ‘रावडी’ म्हणजेच तर खरं देशी प्रेम असं म्हणत भन्साळी त्याचंही समर्थन करतात. आणि मी आता तुम्हाला राम आणि लीलाची गोष्ट सांगणार आहे म्हणत ती गोष्ट नक्की कशी सापडली इथपासून गप्पांना सुरूवात होते..
मी राम-लीलाची गोष्ट चितारली आहे हे पहिल्यांदा नीट लक्षात घ्या.. (‘रामलीला’ या शब्दावरून उठलेल्या अर्थहीन चर्चेला पूर्णविराम देण्याचा पहिला प्रयत्न). शेक्सपिअरच्या ‘रोमिओ-ज्युलिएट’ची कथा मी जशीच्या तशी स्वीकारली आहे. कित्येक दिवस भव्य-दिव्य, लोकांना प्रेमात पडायला लावेल अशी कथा मला साकारायची होती आणि रोमिओ-ज्युलिएटची प्रेमकथा रंगवणं हे तर स्वप्न होतं. ‘राम-लीला’ च्या प्रेमकथेतून ती मी रंगवली आहे. फक्त त्यांना गुजरातच्या संस्कृतीची पाश्र्वभूमी दिली आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रोमिओ-ज्युलिएटसारखी भव्य प्रेमाची कथा मांडायची तर त्यात विविध रंग हवेत, ढंग हवेत. दिग्दर्शक म्हणून मोठे लँडस्केप्स, मोठमोठाल्या हवेल्या, त्यातले सजवलेले-रंगवलेले दिवाणखाने, अगदी माती लिंपून केलेल्या झोपडय़ांवरही उमटणारी चित्रे, दारासमोरच्या रांगोळ्या.. इतकी कलात्मकता आजूबाजूला आहे ती पडद्यावर रंगवणे हे मोठे आव्हान वाटते. ‘राम-लीला’मध्ये हे साध्य करण्याचा प्रयत्न मी केला आहे, असं संजय लीला भन्साळी सांगतात.
चित्रपट नेहमी असाच भव्य-दिव्य असायलाच पाहिजे का?, असा प्रश्न निदान माझ्याबाबतीत तरी नेहमी विचारला जातो. पण, तुम्हाला एक सांगतो, कसं आहे ना दाराबाहेर रांगोळी काढायला कदाचित तुमच्या पिढीला आवडणार नाही किंवा आवडलं तरी काढायची राहून गेली म्हणून तुम्हाला फरक पडणार नाही. पण, तुमच्या आईच्या बाबतीत तसं नसतं. त्यांना दारात ती रांगोळी काढल्याशिवाय आणि त्यात रंग भरल्याशिवाय सणाची सुरुवातच झाल्यासारखी वाटणार नाही. रांगोळी, दिवे नसतील तर त्यांना सण असूनही नसल्यासारखा आहे. हा फरक आहे, ही संस्कृती आहे. दिवाळीच्या आधी मी कधी दादरच्या त्या परिसरात फिरतो तेव्हा वेगवेगळ्या आकाशकंदिलांची रांगच्या रांग दिसते, डोळे दिपून जातात पण, मनाचं समाधान होत नाही. पुढच्या पिढयांना कदाचित रांगोळी, दिवाळी माहीतच होणार नाही. पण, तीच मोठी चूक ठरेल. आपली संस्कृती जगासमोर आलीच पाहिजे, त्यांना दिसलं, कळलं आणि जाणवलं तर नक्की तेही आपली संस्कृ ती शोधत येतील. त्यामुळे माझ्या संस्कृतीतली, माझ्या मातीतली कथा मला भव्यदिव्यपणे मांडायला आवडते आणि यापुढेही मी ते करत राहणार, असा विश्वास भन्साळी व्यक्त करतात.
मुळात, त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ‘राम-लीला’ची कथा त्यांच्या इतक्या रोमरोमात भरली आहे की आपल्याला प्रश्न विचारायची गरजच पडत नाही. कारण, त्यांच्या गप्पांची गाडी आपोआप कथेकडून त्यांच्या पडद्यावरच्या राम (रणवीर सिंग) आणि लीला (दीपिका पदुकोण)कडे वळते. माझ्याकडे ही प्रेमकथा मांडायला दीपिका आणि रणवीरसारखे चांगले कलाकार आहेत ही किती भाग्याची गोष्ट आहे. आपल्याकडे फार चांगले कलाकार आहेत. वैजयंतीमालासारखी उत्कृष्ट नर्तक अभिनेत्री आपल्याकडे आहे पण आपण त्यांच्या गुणवत्तेचा विचारच करत नाही. रणवीर हा अगदी देशी, आपल्या मातीतला अभिनेता आहे. तो रांगडा आहे, तो उत्साहाने त्याच्या मनातलं बोलत राहतो. त्याच्या स्वभावात औपचारिकतेची बंधनंच नाहीत की त्याच्या उच्चारांमध्ये तथाकथित शहरी सभ्यता नाही. असे कलाकार आपल्याकडे नाहीत.
‘राम-लीला’चे संगीत भन्साळींनी स्वत: दिले आहे तर काही गाणीही त्यांनी लिहिली आहेत. आणि सध्या ‘राम-लीला’च्या गाण्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता या आघाडीवरही ते यशस्वी ठरलेत असे म्हणायला हरक नाही. ‘गुजारिश’च्या वेळेलाच संगीत देण्याचा प्रयत्न केला होता पण, भितीने श्रेय घेतलं नव्हतं. लोकांनी ‘गुजारिश’ची गाणी आवडली असं सांगितलं तेव्हा बस्स्! ‘राम-लीला’साठी तर ढोल काढा, नगारा वाजवा..गरबा घुमला पाहिजे. मस्त रमलो होतो मी गाणी करणं, गुणगुणणं, चाली तयार करणं.. हे सांगतानाही भन्साळी त्या आठवणीत रमले होते. प्रेमसारखा नाजूक विषय मांडणारा दिग्दर्शक निर्माता म्हणून समोर येताना ‘राऊडी राठोड’ घेऊन कसा काय येतो?, यावर ते हसतात मला ‘राऊडी राठोड’ खूप आवडतो. लोफर, चोर मचाए शोर, हसीना मान जाएगी असे चित्रपट बघत मी मोठा झालो आहे. त्यामुळे मला तो राऊडीपणा आवडतो पण, दिग्दर्शक म्हणून मला तसे चित्रपट करता येणार नाही हे मला पक्कं ठाऊक आहे. पण, निर्माता म्हणून मी वेगवेगळ्या विचारांचे दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्याबरोबर काम करू शकतो, त्यात मजा येते. आता तर मी पुन्हा अक्षयबरोबर ‘गब्बर’ करणार आहे..धम्माल आहे. आणि माझ्या प्रेमकथा संपल्यात कुठे?.. ‘राम-लीला’ झाली तरी माझ्याक डचं प्रेम संपलेलं नाही ते कुठेतरी ‘बाजीराव-मस्तानी’ करताना पुरेपूर उतरावं अशी माझी इच्छा आहे!

आपले नायक
‘फिरंगी’ तर झाले नाहीत ना..
आपले आघाडीचे नायक फिरंगी तर झाले नाहीत ना, असा प्रश्न मला पडतो. ते पडद्यावर वावरत असताना त्यांच्यात पाश्चात्य आविर्भाव सतत डोकावत असतात. वास्तविक, आपल्याला अजय देवगण आणि सलमान खानसारखे देशी, या मातीतला अस्सलपणा टिकवणारे नायकच हवेत. रणवीरसारखा एखादा रांगडा तरूण जेव्हा दीपिकासारख्या नाजूक स्वभावाच्या मुलीबरोबर पडद्यावर एकत्र येईल तेव्हा तुम्हाला
कु ठली केमिस्ट्री घडवायची काय गरज उरणार आहे? मला स्पष्टपणे वाटतं आपल्याकडे जे आहे ते अभिमानाने मिरवायला हवं..