उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून विदर्भातील तापमान ४४ अंशावर गेले असून उन्हाच्या तडाख्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. वर्दळीचे रस्ते पूर्णत: निर्मनुष्य आहेत. विदर्भातील अनेक नद्या, तलाव आणि विहिरी कोरडय़ा पडत आहेत. अनेक वस्त्यांमध्ये आज माणसालाही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पशुपक्ष्यांचीही तीच अवस्था आहे. पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, निसर्ग टिकला तरच मनुष्य वाचेल हे व्यवहार ज्ञान लक्षात ठेवून प्राणीमात्राच्या नाही, किमान आपल्या अस्तित्वासाठी तरी एवढे करा, अशी भावनिक साद भारतीय जनता महिला आघाडी आणि जिरो माईल फाऊंडेशनसह शहरातील विविध पक्षीमित्रांनी जनतेला घातली आहे.
शहरात भारतीय जनता पक्ष महिला आघाडीसह काही सामाजिक संघटनांनी पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी मातीचे भांडे वितरित केले आहे. काही सामाजिक आणि पक्षीमित्र संघटनांनी प्रबोधनात्मक पत्रकेही वाटली असून त्याचे दृश्य परिणामही शहरातील विविध भागात दिसून येत आहेत. भाजपाच्या महिला आघाडीतर्फे अध्यक्ष कीर्तीदा अजमेरा यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी शहरातील ७२ प्रभागांमध्ये पक्षी आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी मातीचे भांडे शहरातील विविध भागात ठेवले आहे. नागरिकांनी आपल्या निवासाच्या टेरेसवर मातीचे
भांडे ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील अनेकांच्या घराच्या छतावर पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिग, तसेच औद्योगिकीकरण, जंगलतोड आदींमुळे पशु-पक्ष्यांची संख्या झपाटय़ाने घटत आहे. शहरात तर चिऊ, काऊचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. काही प्राणी व पक्षी मुलांना चित्रातून किंवा संगणकावर दाखवावे लागतात. आता उरल्यासुरल्या प्राणीमात्रांसाठी प्रत्येकाने थोडेसे कष्ट घ्यायला हवेत. हे पक्षी पाण्यावाचून तडफडून मरू नयेत म्हणून किमान प्रत्येकाने घराच्या छतावर किंवा ज्याठिकाणी पक्षी येतात त्या ठिकाणी एका भांडय़ात पाणी ठेवले पाहिजे. नाहीतर आपल्या मुलांसाठी चिऊताई, काऊ गोष्टीच्या पुस्तकातच राहतील, कोकिळेचे कुंजन ऑयपॉडवर ऐकावे लागेल. आपली संस्कृती भूतदया शिकवते, नव्हे तिचा तो आत्माच आहे. त्यामुळे प्रत्येकाला करावेच लागेल.
तापमान अधिक वाढल्यामुळे मूक प्राण्यांच्या आणि पशु-पक्ष्यांच्या शरीरात पाण्याची फार कमी होते. त्यांना पिण्याकरिता पाणी मिळाले नाही तर त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्याकरिता सवार्ंमिळून सेवेची भावना समोर ठेवून आपल्या-आपल्या घराच्या अंगणात, छतावर, बालकनीमध्ये पाण्यांनी भरलेले जलपात्र ठेवून पक्ष्यांचे जीवन वाचवू शकतो. या सेवाभावी कार्याला समोर येऊन आपला हातभार लावावा व आपला उदारतेचा खरा परिचय करून द्यावा, असे आवाहन जिरो माईल फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष दीपक लालवानी  यांनी समाजसेवी संस्थांना व नागरिकांना केले.