जिल्ह्य़ात तीन महिन्यांत संततधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे गाळ साचून नाले उथळ झाले आहेत. पुराचे पाणी नाल्यांमधून सहजरित्या वाहून जाण्यासाठी या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी तसेच गावांजवळ पूर संरक्षण भिंती बांधण्यासाठी निधीची तरदूत करावी, अशी मागणी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्य़ात गावांच्या मधून किंवा गावाजवळून वाहणारे नाले गाळ साचून व वनस्पती निर्माण होऊन उथळ झाले आहे. यामुळे नदी व नाल्यांना आलेल्या महापुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्य़ात अनेक घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्य़ात  यावर्षी अतिवृष्टीमुळे ३५ नागरिकांचा मृत्यू झाला. साडेचार हजारांवर घरे पडली आणि अडीच लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. साडेचार हजार हेक्टर जमीन पूर्णत: खरडून गेली आहे. एवढे मोठे नुकसान जिल्ह्य़ात झालेले आहे. कामठी, मौदा व नागपूर ग्रामीण तालुक्यांतील गावांजवळील नाल्यांचे खोलीकरण व रुदीकरण करण्यासाठी तसेच पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनातून केली आहे.
नागपूर शहरातून ग्रामीण भागात जाणारे सात नाले आहेत. ढोऱ्यापुरा नाला, मानेवाडा ते पिपळा नाला, मांगगारोडी टोली ते पिपळा नाला, सेंट्रल रेल्वे ते घोगडी नाला, वर्धा मार्ग ते घोगली नाला, बिडीपेठ ते नरसाळा पोहरा नदीपर्यंतचा नाला, दिघोरी ते पोहरा नदीपर्यंतच्या नाल्यांचा यामध्ये समावेश आहे. वरंभा, निंबा, महालगाव, दिघोरी, घोरपड, सावळी, सेलू, पावनगाव, धारगाव, कापसी, असोली, परसाड, केम, शिवनी आदी गावे नागनदीलगतच्या क्षेत्रात आहेत. कामठी व मौदा तालुक्यांतील जवळपास ५० वर गावे नद्यांजवळ आहेत.
कोराडी औष्णिक वीज प्रकल्पातून निघणारी राख कोराडी अ‍ॅशबॅड नाला, खसाळा अ‍ॅशबॅड नाला, वारेगाव अ‍ॅशबॅड नाला, सुरादेवी नाला, सुरादेवी ते कोलार नदीला जोडणारा नाला व कवठा -खैरी नाला अशा सहा  नाल्यांमध्ये विसर्जित करण्यात येते. पावसाळ्यात आजूबाजूच्या परिसरात व शेतात राखयुक्त पाणी गेल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे, ही बाबही बावनकुळे यांनी  मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. पुरामुळे दरवर्षी मोठय़ा प्रमाणात होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी गाळ साचून उथळ झालेल्या नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करावे आणि पूर संरक्षण भिंती बांधाव्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.