शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो)सह विविध शासकीय रुग्णालयांच्या परिसरात चोरी आणि लोकांना लुबाडण्याच्या घटना उघडकीस आल्याने रुग्णालयांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ख्याती असलेल्या मेडिकल व मेयोच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था केवळ नावाला असल्यामुळे गेल्या काही दिवसात रुग्णालयांमध्ये अनेक चोरीचे आणि नागरिकांना लुबाडल्याचे प्रकार घडले आहेत. मेडिकलमध्ये सुरक्षा रक्षकांची असलेली अपुरी संख्या आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे चोरी आणि लुबाडण्याचे प्रकार होत आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दोन प्रतीक्षालये असले तरी त्यात असलेली अस्वच्छता आणि मद्यपींचा वावर आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे नातेवाईक तेथे आराम न करता वॉर्डाच्या बाहेर असलेल्या कॅरिडोरमध्ये सतरंजी टाकून आराम करीत असतात. मात्र, रात्रभरात त्यांचे सामान चोरीला गेल्याच्या घटना घडल्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कुठलाही सुरक्षा रक्षक किंवा रुग्णालयातील कर्मचारी दिसून येत नाही. त्यामुळे अनेक लोक वॉर्डात बिनधास्तपणे फिरताना दिसून येतात. बाहेरगावावरून आलेल्या एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाला संबंधित वॉर्ड दिसत नसेल तर त्याने कुठे विचारावे यासाठी माहिती कक्ष नाही. बाह्य़ रुग्ण विभागात काही नागरिक विचारणा करीत असतात. मात्र, त्याच्याशी नीट बोलले जात नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहेत.
गेल्या काही दिवसात शासकीय रुग्णालय परिसरात सायकल स्टॅण्ड किंवा परिसरात ठेवण्यात आलेली वाहने चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मेडिकल कॅन्टिनजवळील पार्किंगमध्ये कुठलीच सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे या भागात कोणीही येऊन वाहने उभी करीत असतात. याशिवाय अधिष्ठाता कार्यालयासमोर पार्किंग नसताना त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहने लावली जातात. त्याकडे मेडिकल प्रशासनाचे लक्ष नाही. ज्या कंत्राटदाराकडे पार्किंगची व्यवस्था देण्यात आली, तो अनेक दिवस रुग्णालयात येत नाही. पार्किंगच्या ठिकाणी असलेले कर्मचारी नागरिकांकडून वाहने ठेवण्यासाठी पैसे घेतात. तुमच्या भरवशावर तुम्ही वाहने ठेवा, असे सांगितले जाते. चोरीच्या प्रकारासोबत रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना लुबाडण्याचे प्रकार उघडकीस आल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत. जन्माचा दाखला मिळविणे किंवा ईसीजी काढणे ही कामेही अतिरिक्त पैसे दिल्याशिवाय रुग्णालयात होत नसल्याची उदाहरणे आहेत. त्यासंदर्भात अनेक रुग्णांनी अधिष्ठाताकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु त्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2013 रोजी प्रकाशित
शासकीय रुग्णालयांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात (मेयो)सह विविध शासकीय रुग्णालयांच्या परिसरात चोरी
First published on: 13-11-2013 at 07:56 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security in government hospital on anvil