कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का द्यायचा, अशी व्यूहरचना शिवसेना-काँग्रेसच्या नेत्यांनी आखली आहे. विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला बहाल करताना मनसेला कात्रजचा घाट दाखविल्यानंतर शिक्षण मंडळ सभापतीपदापासून मनसेला रोखण्यासाठी शिवसेना-काँग्रेसने जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे चित्र आहे.
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडद्यामागून काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला साहाय्य केल्याची चर्चा आहे. याविषयी उघडपणे चर्चा दोन्ही मतदारसंघांत होती. काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी याविषयी पक्षाच्या नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची तोंडदेखली दखल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली, परंतु प्रत्यक्षात कारवाई होण्यासारखे काहीच घडले नाही. युतीच्या विजयामध्ये नरेंद्र मोदी यांची हवा जशी कारणीभूत ठरली, तशी काँग्रेसचा असहकाराचा फटकाही कल्याणात राष्ट्रवादीला बसला. हे लक्षात आल्यामुळेच मागील साडेतीन वर्षे कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेबरोबर ‘घरोबा’ केलेल्या सत्ताधारी शिवसेनेने आता काँग्रेसबरोबर जुळवून घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत मनसेला महापालिकेत डोके वर काढून द्यायचे नाही, अशी व्यूहरचना शिवसेनेने आखली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीपेक्षा मनसेच्या नेत्यांनी जास्त त्रास दिल्याची शिवसेना नेत्यांची भावना आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे आमदार रमेश पाटील यांचे बंधू राजू पाटील यांनी या निवडणुकीत जोरदार हवा निर्माण करत सुरुवातीच्या टप्प्यात शिवसेना उमेदवाराला घाम फोडला होता. त्यामुळे काहीही झाले तरी विधानसभेत कल्याण ग्रामीणमधून पाटील कंपनीला अद्दल घडवायची, असा चंगच शिवसेनेने बांधला आहे. त्यामुळेच महापालिकेतील मनसेची सगळी रसद बंद करण्यासाठी काँग्रेसला सोबत घेण्याची व्यूहरचना शिवसेना नेत्यांनी केली आहे.
महापालिका स्थायी समिती सभापतीपद मिळविण्यासाठी मनसेने केलेली खेळी मोडून काढण्यात शिवसेना नेत्यांना नुकतेच यश आले. मनसेला धक्का देताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेला ‘हात’ दिला. या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचा एक नगरसेवक गैरहजर राहिला. यामुळे मनसेचा पाडाव होऊन सभापतीपद शिवसेनेला मिळवता आले. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या मदतीच्या ‘हाताची’ उतराई होण्यासाठी शिवसेनेने महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती काँग्रेसच्या सदस्याला देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सभापतीपदापासून मनसेच्या उमेदवाराला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसबरोबर गट्टी जमवली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विद्यमान शिवसेनेच्या सभापतींचा राजीनामा घ्यायचा आणि त्या पदावर काँग्रेसचे राकेश मुथा यांना बसवायचे अशी व्यूहरचना काँग्रेस आणि शिवसेनेकडून आखली जात असल्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू आहे. या सगळ्या हालचालींमुळे काँग्रेसमधील एका मोठय़ा गटात अस्वस्थता असून शिवसेनेसोबत हातमिळवणी भविष्यात जड जाऊ शकते, असा इशारा या गटाकडून दिला जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2014 रोजी प्रकाशित
मनसेला रोखण्याच्या शिवसेना-काँग्रेसच्या हालचाली!
कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का द्यायचा, अशी व्यूहरचना शिवसेना-काँग्रेसच्या नेत्यांनी आखली आहे.
First published on: 06-06-2014 at 02:24 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena congress start activity to prevent mns