भांडुप पश्चिमेकडील शिवाजी तलाव म्हणजे अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. मात्र, झोपडपट्टीतून टाकला जाणारा कचरा, मलमूत्र विसर्जन यामुळे अनेक वर्षे हा तलाव गाळात गेला होता. सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन या तलावात होत असल्याने दरवर्षी तलावातील गाळ काढला जातो. सध्या या तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. परंतु त्याचे श्रेय घेण्यासाठी सेना-मनसेत जुंपली आहे. सुशोभिकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाल्यावर मनसेला जाग आल्याचा आरोप सत्ताधारी करतात तर मनसेच्या नगरसेवक-आमदारांनी पुढाकार घेऊन कामाला गती दिल्याने शिवसेनेला जाग आल्याचा मनसेचा आरोप आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी तलावाचे सुशोभिकरण रखडले होते. गेल्या वर्षी त्याला मुहूर्त सापडून पालिकेने निविदा काढल्या. तलावाच्या कडेला भिंती बांधण्यासाठी तसेच बाजूने पदपथ करण्यासाठी कंत्राट दिले गेले. मात्र, प्रत्यक्षात अतिक्रमण असलेली बांधकामे हटवण्यास पालिकेला अपयश आल्याने कंत्राटदाराने फक्त तलावाच्या दोन्ही बाजूला आरसीसीच्या भिंती बांधून दिल्या व पुढील काम करण्यास नकार दिला त्यामुळे गेल्या वर्षी जूननंतर पुन्हा एकदा हा तलाव दुरुस्तीअभावी राहिला. यावेळी पालिकेने पुन्हा सुशोभिकरणाचे कंत्राट दिले असून तलावातील गाळ काढून झाला आहे तसेच बाजूचे खडक फोडून तलावाची खोलीही वाढवण्यात आली आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी वाहन पोहोचावे यासाठी रॅम्पही बांधून पूर्ण होत आला आहे. मात्र सेना- मनसे यांच्यामध्ये श्रेयावरून वाद सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे शुक्रवारी संध्याकाळी उशिरा बठक सुरू होती.

या तलावाची दुरुस्ती करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिकेकडे तगादा लावला होता. प्रत्यक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कामाचा मुहूर्त केला होता. आता काम ९० टक्के पूर्ण झाले असताना बाजूला रेिलग आणि पदपथ टाकण्यासाठी मनसेचे आमदार पुढे आले आहेत. रेलिंग लावून त्यावर नाव लिहायला हे मोकळे. नुसते नाव लिहून काय फायदा, मूळ काम नको का करायला?
अशोक पाटील, शिवसेना नगरसेवक

भांडुपमध्ये १९९७ पासून सेनेचे नगरसेवक असूनही सेनेच्या नेत्यांनी मुहूर्त करण्यापेक्षा अधिक काही केलेले नाही. आधी लिलाधर डाके, मग महसूलमंत्री असताना सुधीर जोशी, त्यानंतर नारायण राणे व आता उद्धव ठाकरे यांनी या कामाचे फक्त मुहूर्त केले. मात्र भांडुपच्या नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या विषयावर पुढे काही झाले नाही. 2012 मध्ये मनसेचे नगरसेवक निवडून आल्यावर या कामाला गती दिली गेली. मी स्वत विधानसभेत चार वेळा हा प्रश्न उपस्थित केला. तवासासाठी मंजूर झालेला पन्नास लाख रुपयांचा आमदार निधी वापरण्याबाबत पालिकेला गेल्या महिन्यात कळवले असूनही त्यांची चालढकल सुरू आहे.
शिशिर शिंदे, मनसे आमदार

गेली अनेक वष्रे सातत्याने प्रयत्न केल्यावर शिवाजी तलावासारख्या उपनगरातील महत्त्वाच्या स्थळाच्या सौंदर्यीकरणाचे काम मार्गी लागले आहे. आता ते पूर्णत्वास जात असताना त्याचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. आमदार निधीतून पदपथाचे काम करून घेण्यासाठी पालिकेच्या अधिकारयांवर दबाव टाकण्यात येत आहे. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही, मी स्वत या स्थळाला भेट देऊन कामाची पाहणी करणार आहे.
यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष