उरण तालुक्यात व शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व अनेकदा मागण्या करूनही धोकादायक विजेचे खांब व तारा न बदलल्याने होणारे अपघात, याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी उरण तालुका शिवसेनेने उरण महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चाच्या शिष्टमंडळाला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अनेक आश्वासने दिली असून वीज ग्राहकांनी तक्रारीसाठी केलेला फोन न घेतल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आश्वासन अधिकाऱ्यांनी या वेळी दिलेले आहे. गावोगावच्या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढील दोन दिवसांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचेही मान्य केलेले आहे.
महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा, विजेचे भारनियमन रद्द करा, धोकादायक विजेच्या तारा व खांब त्वरित बदला आदी जोरदार घोषणा देत शिवसेना शाखा येथून शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख दिनेश पाटील तसेच युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख दीपक भोईर यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. मोर्चा भर पावसात उरण शहरातून महावितरणच्या कार्यालयावर नेण्यात आला होता. या वेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या वेळी महावितरणचे अधिकारीही उपस्थित होते. तालुक्यातील विजेच्या समस्या त्वरित दूर कराव्यात, तसेच उरण तालुक्यात वायू विद्युत केंद्रात विजेची निर्मिती होत असल्याने तालुक्यात भारनियमन करू नये, असे शासनाचे आदेश आहेत. त्याची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी या वेळी मोर्चात करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2014 रोजी प्रकाशित
महावितरणच्या अनागोंदीविरोधात शिवसेनेचा उरणमध्ये मोर्चा
उरण तालुक्यात व शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व अनेकदा मागण्या करूनही धोकादायक विजेचे खांब व तारा न बदलल्याने होणारे अपघात, याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी उरण तालुका शिवसेनेने उरण महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
First published on: 16-07-2014 at 07:11 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena morcha against mahavitaran