पार्किंगच्या जागेत दुकाने..कर मात्र तुरळक
ठाणे शहरातील काही बडय़ा मॉलचे व्यवस्थापन वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागांमध्ये बिनदिक्कत व्यावसायिक गाळे चालवीत असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी स्थायी समिती सभेत पुढे आली. वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागेत इतर कुठलाही व्यावसायिक वापर करता येत नाही. असे असताना पूर्व द्रुतगती महामार्गावर व्यवसाय थाटून बसलेल्या काही बडय़ा मॉलमध्ये वाहनतळांच्या जागेचा बेकायदा व्यावसायिक वापर सुरू असून अशा गाळ्यांना आतापर्यत पार्किंग दरानुसार तुरळक दराने मालमत्ता कराची आकारणी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंबंधीची काही प्रकरणे स्थायी समिती सभेत काही सदस्यांनी उघड केली असता खडबडून जागे झालेल्या मालमत्ता कर विभागाने या सर्व मॉल व्यवस्थापनांना यापुढे व्यावसायिक दराने मालमत्ता कराची आकारणी केली जाईल, अशी माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून वाहनतळाच्या अतिशय माफत दराने सुरू असलेली कर आकारणी मागे घेतली जाईल आणि जुन्या कराची वसुलीही व्यावसायिक दराने केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. असे असले तरी इतके दिवस याप्रकरणी डोळेझाक करणारे मालमत्ता विभागातील काही अधिकारी गोत्यात येण्याची चिन्हे असून काही बडय़ा मॉलवरही कारवाईची चिन्हे दिसू लागली आहेत.
याशिवाय मॉलमधील प्रत्येक मजल्यावरील मोकळ्या जागेत सुरूकरण्यात आलेल्या व्यावसायिक ठेल्यांना यापुढे व्यावसायिक कर आकारला जाईल, असेही कर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. इतके दिवस अशाप्रकारे कर आकारणी का होत नव्हती या प्रश्नावर मात्र मालमत्ता कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ठोस उत्तर नव्हते. यानिमित्ताने शहरातील बडय़ा मॉल व्यवस्थापनाने महापालिकेतील काही बडय़ा अधिकाऱ्यांशी संगनमत करून मालमत्ता कर विभागाला कोटय़वधी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस येत असून यासंबंधी अधिक चौकशी करण्याची मागणी महापालिका वर्तुळात केली जात आहे.
ठाणे शहरातील सर्वच मॉलमध्ये पार्किंगच्या जागेत व्यावसायिक गाळे उभारण्यात आले असून त्या ठिकाणी वाहन धुलाई तसेच अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार पार्किंगच्या जागेत गाडय़ा धुण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करता येते, मात्र गोदामांव्यतिरिक्त कोणताही व्यावसायिक वापर सुरूकरता येत नाही. असे असताना पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोरमसारख्या काही बडय़ा मॉलमध्ये पार्किंगच्या जागेचा वापर व्यावसायिक वापरासाठी होत असल्याचा आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी स्थायी समिती सभेत केला. व्यावसायिक वापर सुरू असूनही या जागेवर कर आकारणी पार्किंगच्या दरानेच सुरू असल्याने महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. तसेच पार्किंगच्या जागेत गाळे उभारल्यामुळे मॉलमध्ये येणारी वाहने रस्त्यावर उभी राहू लागली आहेत. परिणामी, शहरात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे, असे काही मुद्देही म्हस्के यांनी उपस्थित केले. मॉलच्या प्रत्येक मजल्यावरील मोकळ्या जागेत खाद्य पदार्थ तसेच अन्य व्यवसायाचे छोटे छोटे ठेले लावण्यात आले आहेत. पार्किंगच्या जागेत गाळे उभारून त्या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या मॉलधारकांना व्यावसायिक दरानुसार कर आकारणी करायला हवी. मात्र, महापालिका प्रशासनाकडून यासंबंधी बघ्याची भूमिका घेतली जात असल्यामुळे काही कोटी रुपयांचा कर बुडत असल्याचा मुद्दा म्हस्के यांनी उपस्थित केला. यावेळी सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले असता कोरम मॉलमध्ये पार्किंगच्या जागेत सुरू असलेल्या गाळ्यांना व्यावसायिक दराने कर आकारणी सुरू करण्यात आली असून गेल्या सहा वर्षांपासूनचा कर त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे कर विभागाच्या अधिकारी वर्षां दीक्षित यांनी स्पष्ट केले. तसेच शहरातील इतर मॉलमध्येही अशा प्रकारचा कर आकारण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2014 रोजी प्रकाशित
करबुडव्या मॉलचा पालिकेला कोटींचा गंडा
ठाणे शहरातील काही बडय़ा मॉलचे व्यवस्थापन वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागांमध्ये बिनदिक्कत व्यावसायिक गाळे चालवीत असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी स्थायी समिती सभेत पुढे आली.
First published on: 25-06-2014 at 08:12 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopping mall cheat with corporation