हिंगोली जिल्ह्य़ातील ४९ आणि नांदेडमधील १४ अशा ६३ गावांसाठी सिद्धेश्वर धरणातून कालव्याद्वारे उद्या (शनिवारी) १० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी या बाबत प्रयत्न केले. मुंबईतील बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
गुरुवारी यलदरी धरणातून ४० दलघमी पाणी सिद्धेश्वर धरणात सोडले. शुक्रवारी रात्रीपर्यंत सिद्धेश्वर धरणात पाणी जमा झाल्यावर कालव्याद्वारे पाणी सोडले जाईल. याचा लाभ नांदेडसह हिंगोली जिल्ह्य़ातील गावांना होणार आहे. हे पाणी ३१ जुलैपर्यंत पुरेल, असे नियोजन करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत.
पाणी सोडण्याबाबत ३० एप्रिलला मंत्रालयातून आदेश निघूनही अंमलबजावणी मात्र न झाल्याने आमदार दांडेगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून बैठकीत लक्ष वेधले. तब्बल एक महिना लांबलेले आवर्तन मे महिन्यात दिले. ही दिरंगाई पाहता दुसऱ्या आवर्तनाची अपेक्षा कशी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
१५ गावांना ११ टँकरने पाणी
हिंगोली जिल्ह्य़ात १५ गावांना ११ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी सुमारे १० कोटी ७३ लाखांच्या टंचाई आराखडय़ास मंजुरी दिली. पाणीपुरवठय़ाच्या ४२ पैकी ३२ अंदाजपत्रकांना प्रशासनाने मान्यता दिली.
टंचाईच्या नावाखाली झालेले एकूण विविध कामाचे सर्वेक्षण व प्रत्यक्ष कामाची अवस्था कासवगतीने होणारे काम उन्हाळ्यात उपयोगी पडणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकूणच जिल्ह्य़ात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असल्याने टँकरची मागणी वाढणार आहे.