गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या बडनेरा येथील रेल्वे व्ॉगन दुरुस्ती कारखान्याचे काम मार्गी लागण्याचे संकेत मिळाले असून जमीन अधिग्रहणासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने आता भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.  
बडनेरा येथे २४७.५७ कोटी रुपये खर्चून रेल्वे व्ॉगन दुरुस्ती कारखाना उभारण्यात येणार असल्याची घोषणा २०१०च्या रेल्वे अंदाजपत्रकात करण्यात आली होती. त्यावेळी जाहीर झालेले अनेक प्रकल्प मार्गी लागलेले असताना या कारखान्याचे काम भूसंपादन आणि पाठपुराव्याअभावी रखडले होते. यासाठी ७७.७५ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यासाठी टाकळी खूर्द येथील ७२.१७ हेक्टर, बडनेरा येथील २.९६ हेक्टर आणि दुर्गापूर येथील २.७२ हेक्टर जमीन संपादित करण्याचे प्रस्तावित आहे. सुमारे ६४ शेतकऱ्यांच्या मालकीच्या या जमिनी आहेत. या कारखान्यामुळे २३ घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनाही विस्थापित व्हावे लागणार आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनीचे भाव ठरवताना सुरुवातीला घाई करण्यात आली. अत्यल्प दरांमुळे शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध दर्शवला होता. या कारखान्यासाठी लागणाऱ्या जमिनीला ४० लाख रुपये प्रती एकर, असे दर लावण्याची मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली होती. दरांबाबत वाटाघाटी करण्यासाठी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रवी राणा, रावसाहेब शेखावत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात अनेकदा बैठका झाल्या, पण त्यातून तोडगा निघू शकला नाही. सुरुवातीला प्रशासनाने सात लाख प्रती एकर दराने जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. नव्याने वाटाघाटी झाल्या त्यावेळी कोरडवाहू जमिनीसाठी १५ लाख रुपये प्रती हेक्टर, हंगामी बागायती जमिनीसाठी २२.५० लाख रुपये आणि बारमाही बागायती जमिनीसाठी ३० लाख रुपये देण्याचा प्रस्तावही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नाकारला होता. या प्रकल्पाच्या भूसंपादनात राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतले असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपही झाला होता.
अखेर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने गेल्या १२ जुलै रोजी रेल्वे प्राधिकरणाकडे पाठवलेल्या पत्रात भूसंपादनासाठी १५ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी नोंदवण्यात आली. हा निधी मंजूर झाला असून त्यातील काही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बडनेरा येथे मंजूर झालेल्या या प्रकल्पाच्या मार्गात भूसंपादनाचा मोठा अडसर निर्माण झाल्याने या प्रकल्पाचे काम ठप्प पडून हा प्रकल्प इतरत्र हलवला जाणार काय, अशी भीती वर्तवण्यात येत होती, पण आता भूसंपादनासाठी वाढीव निधी मंजूर झाल्याने भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होईल, असे सांगण्यात येत असले, तरी त्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी कितपत सहकार्य करतात, यावर भूसंपादनाच्या प्रक्रियेचे यश अवलंबून आहे. २०१० च्या रेल्वे अंदाजपत्रकात मंजूर झालेल्या अनेक प्रकल्पांचे काम सुरू झालेले असताना बडनेरा रेल्वे व्ॉगन दुरुस्ती कारखान्याचे काम मात्र मागे पडले आहे. सध्या हा प्रकल्प रेल्वे विभागाच्या लेखी नियोजनाच्या पातळीवरच आहे.