पर्यावरणक्षेत्रात अनेक स्वयंसेवी संस्थांचे पेव फुटले आहे, पण यातील अधिकांश स्वयंसेवी संस्थांमुळेच नागरिकांमध्ये पर्यावरणाप्रती जागरुकता निर्माण झाली, हेही तेवढेच खरे आहे. हिरवाईच्या बाबतीत नागपूर शहराने भारतात तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करताना कुठेतरी या शहराच्या हिरवळीवर कुऱ्हाड चालत आहे. झाडे लावण्यासाठी साऱ्याच संस्था पुढे येतात. तोडल्या जाणाऱ्या झाडांना थांबवणारे मात्र बोटावर मोजण्याइतके आहेत.
राज्याच्या या उपराजधानीतूनच राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणले गेल्याने येथे वृक्षतोड मोठय़ा प्रमाणावर झाली आणि होत आहे. शहराच्या आतही तीच परिस्थिती आहे, पण ग्रीन विजिल या स्वयंसेवी संस्थेने शहरातील या वृक्षतोडीला आळा घालण्यात यश मिळवले आहे. सेमिनरी हिल्सवरील एका पाण्याच्या प्रकल्पात सुमारे २७० झाडे कापण्याचा निर्णय नागपूर महापालिका आणि ओसीडब्ल्यू यांनी घेतला. या झाडांची मुळे पाण्याच्या टाकीत शिरल्याने पाणीपुरवठय़ात अडथळ्याचे कारण देण्यात आले. त्याचवेळी ग्रीन विजिलने याला विरोध केला आणि आधी अभ्यास करूनच, केवळ ७७ झाडे कापूनसुद्धा ही समस्या कशी सोडवली जाऊ शकते ते महापालिका आणि ओसीडब्ल्यूला सांगितले. त्यामुळे विनाकारण जाणारा १९३ झाडांचा बळी वाचला.
होळी आणि निसर्गाचा जसा जवळीकीचा संबंध, तसाच संबंध पर्यावरण आणि निसर्गाचाही आहे. होळीच्या पहिल्या दिवशी प्रचंड मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड करून पर्यावरण प्रदूषित केले जाते. त्याचवेळी धुळवडीत रासायनिक रंगांचा वापर करून पुन्हा पर्यावरण प्रदूषणाला हातभार लावला जातो. वृक्ष तोडू नका, रासायनिक रंगांचा वापर करू नका, असा संदेश सारेच देतात, पण प्रा. विजय घुगे यांनी निसर्ग उद्यान मंडळाच्या माध्यमातून त्याचे प्रात्यक्षिक लोकांना दाखवलेच नाही, तर त्यात सहभागीही करून घेतले. आजही ते होळीसाठी खास ‘इको फ्रेंडली’ रंगांची निर्मिती करतात. त्याचवेळी मातीचे गणपती आणि त्यांना नैसर्गिक रंग वापरून पर्यावरण संरक्षणासाठीसुद्धा पुढाकार घेत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात जाऊन कुंभारांना मातीचे गणपती कसे बनवायचे, त्यांना नैसर्गिक रंग कसे द्यायचे, यासाठी खास प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करतात. यामुळे कुंभारांच्या उपजिविकेवरसुद्धा चांगला परिणाम झाला आहे.
विदर्भात सध्या पाणी आहे, पण पाण्याची नासाडी बघता २० वर्षांनंतर स्थिती काय राहील, हे कुणालाच ठाऊक नाही. मोठय़ांकडूनच पाण्याची नासाडी होणार असेल तर लहानग्यांकडून त्याची अपेक्षाच न केलेली बरी! मात्र, अलीकडे पर्यावरणाविषयीची जनजागृती वाढत आहे आणि त्यातही या जनजागृतीची सुरुवात लहानग्यांपासून केली तर ते अधिक प्रभावी ठरेल. ‘पर्यावरण प्रथम’ या संस्थेनेही अशीच सुरुवात केली आणि त्यात त्यांना आता यशसुद्धा येऊ लागले आहे. नागपुरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ‘पाण्याचे पासबुक’ ही संकल्पना अस्तित्वात आणली. सेंट झेवियर्स, मुंडले स्कूल यासारख्या शाळांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे पासबुक तयार करायला सांगितले. यात दररोज घरी किती पाणी लागते, किती वाया जाते, याची नोंद करण्यास सांगितले आणि त्याचा परिणाम म्हणजे या विद्यार्थ्यांच्या घरामध्येही पाण्याच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृती झाली. मोठमोठे कार्यक्रम घेऊन पर्यावरणाचे स्तोम माजवण्यापेक्षा छोटय़ाछोटय़ा कार्यक्रमांमधून होणारी पर्यावरणाची जनजागृती करणाऱ्या यासारख्या काही संस्था खऱ्या अर्थाने नागपुरात पर्यावरण रक्षणाचे काम करत आहे.