भारतीय चित्रपटांचे हे शतसांवत्सरिक वर्ष असून त्यानिमित्त चित्रपटातील मराठी दिग्गजांच्या योगदानाची दखल घेत मुख्यत्वे हिंदी सिनेमाचे महत्त्वाचे टप्पे, व्यक्ती, चित्रपट यांचा अतिशय थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे..
दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट ३ मे १९१३ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला तेव्हापासून भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली गेली असे मानले जाते. या घटनेला येत्या ३ मे रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. युरोपात सिनेमा माध्यमाचा जन्म झाला. सिनेमा हे विज्ञानाधिष्ठित माध्यम भारतात आणले गेले तेव्हा ध्वनीचा शोध लागला नव्हता. सुरुवातीच्या काळात चित्रपट माध्यमाला ‘मेकॅनिकल टॉय’ असे संबोधले गेले. सिनेमा हे नाव नंतर आले. देशात दादासाहेब तोरणे, फाळके यांनी सुरुवातीच्या काळात मूकपट केले तेव्हा हे फक्त दृक माध्यम होते. ध्वनी नसल्यामुळे लोकांना माहीत असलेली गोष्ट पडद्यावर मांडायला हवी म्हणजे लोकांना हे माध्यम समजू शकेल. म्हणूनच राजा हरिश्चंद्राची गोष्ट त्यांनी सांगितली. त्यानंतर अनेक पौराणिक कथा मूकपटाद्वारे लोकांसमोर आल्या. या नव्या माध्यमाचा लोकांनी स्वीकार केल्यानंतर काही वर्षांनंतर पहिला बोलपट हिंदीत आला तो म्हणजे ‘आलम आरा’. अर्देशीर इराणी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९३१ मध्ये झळकला. बोलपटामुळे मूकपटांना मिळत असलेला सर्वभाषिक प्रेक्षक मर्यादित झाला. त्यानंतर १९३२ मध्ये प्रभात फिल्म कंपनीचा व्ही. शांताराम दिग्दर्शित पहिला मराठी बोलपट ‘अयोध्येचा राजा’ झळकला. हा चित्रपट ‘अयोध्या का राजा’ नावाने हिंदीतही झळकला. इथून एकाच वेळी दोन भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा सुरू झाली. केवळ मराठी प्रेक्षकापुरता चित्रपट मर्यादित न ठेवता हिंदी भाषा जाणणाऱ्या लोकांसाठी हिंदी भाषेतही चित्रपट केल्यामुळे आर्थिकदृष्टय़ाही चित्रपट निर्मिती करणे परवडावे ही भूमिकासुद्धा यामागे होती. या पहिल्या मराठी बोलपटाची प्रिंट राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय पुणे येथे जतन करण्यात आली आहे. बाबूराव पेंढारकर, दुर्गा खोटे, गोविंदराव टेंबे आदी कलावंत या पहिल्या मराठी बोलपटात होते. १९३० च्या दशकात मराठी चित्रपटांचा बोलबाला राहिला.
अर्देशीर इराणी यांच्या ‘आलम आरा’पासून हिंदी सिनेमाचा प्रवास सुरू झाला. या पहिल्या बोलपटातील ‘दे दे खुदा के नाम पर’ हे भारतीय चित्रपटातील पहिले गाणे मानले गेले. हे गाणे आणि एकूणच या चित्रपटाचे संगीत प्रचंड लोकप्रिय ठरले. त्या वेळी पाश्र्वगायनाचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. त्यामुळे कलाकार स्वत:च गाणी गायचे. गाण्यांचे तबला, हार्मोनियमच्या साथीने ‘लाइव्ह’ रेकॉर्डिग केले जायचे. महत्त्वाचे म्हणजे हिंदी सिनेमा आणि गाणी हे समीकरण अगदी पहिल्या सिनेमापासून जुळले. गाणी आणि संगीत हे भारतीय चित्रपटांचे आणि त्यातही हिंदी चित्रपटांचा अविभाज्य अंग बनले. युरोपप्रमाणेच भारतातही चित्रपट निर्माण करण्यासाठी स्टुडिओ निर्माण झाले. इम्पिरियल मुव्हिटोन, बॉम्बे टॉकीज, प्रभात फिल्म कंपनी हे सगळे स्टुडिओ होते. कंपनीत ज्याप्रमाणे कर्मचारी असायचे त्याचप्रमाणे फिल्म स्टुडिओमध्येही कलावंत, तंत्रज्ञ सगळेजण पगारी नोकर असायचे.
हिमांशू राय यांच्या बॉम्बे टॉकीजतर्फे १९३३ साली प्रदर्शित झालेल्या ‘कर्मा’ या चित्रपटात चुंबनदृश्य होते. त्या काळी यावरून बराच वादंग निर्माण झाला. १९३७ साली अर्देशीर इराणी यांनी भारतात प्रक्रिया केलेला पहिला रंगीत चित्रपट काढला. ‘किसान कन्या’ असे त्याचे नाव असून पहिल्या भारतीय रंगीत चित्रपटाचा मान इराणी यांना मिळाला. बॉम्बे टॉकीजचा १९३६ साली आलेला ‘अछूत कन्या’ हा चित्रपट गाजला. या चित्रपटाद्वारे योगायोगाने चित्रपटसृष्टीत आलेले अशोक कुमार यांनी पुढची अनेक दशके उत्तमोत्तम भूमिकांनी बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटविला.
याच दरम्यान ‘प्रभात’च्या विष्णूपंत दामले दिग्दर्शित ‘संत तुकाराम’ने अफाट यश मिळविले. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी पाठविण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट असून १९३७ साली त्या महोत्सवातील सवरेत्कृष्ट तीन चित्रपटांपैकी एक म्हणून ‘संत तुकाराम’ला व्हेनिस वर्ल्ड ट्रॉफी पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटाचा प्रथमच गौरव करण्यात आला. १९३५ साली प्रथमेश चंद्र बारुआ दिग्दर्शित ‘देवदास’ या शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात गायक कुंदनलाल सैगल यांची भूमिका होती. त्यातील गाण्यांमुळे चित्रपट गाजला. १९४० ते ४५च्या दरम्यान भारतीय चित्रपटांवर महायुद्धाचे विपरीत परिणाम झाले. चित्रपटाच्या लांबीवर दोन तासांचे बंधन घालण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर हिंदी सिनेमा, भारतीय सिनेमा पूर्णपणे बदलला. महत्त्वाचे म्हणजे स्टुडिओ सिस्टीम बंद झाली. एकोणीसशे तीस-चाळीसच्या दशकात कुंदनलाल सैगल, मास्टर विठ्ठल, फियरलेस नादिया, दुर्गा खोटे, पृथ्वीराज कपूर, लीला चिटणीस, शोभना समर्थ, ललिता पवार, मोतीलाल, शकुंतला परांजपे, मास्टर विनायक, आगा अशा अनेक कलावंतांचे चित्रपट आले. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतरच्या काळात १९५० चे दशक हिंदी सिनेमासाठी महत्त्वाचे ठरले. स्टार कलावंत उदयास आले. ‘ज्वार भाटा’द्वारे रुपेरी पडद्यावर आलेले अभिनेते दिलीपकुमार यांचा ‘देवदास’ चित्रपट गाजला. ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून त्यांना ओळखले गेले. याच काळात देव आनंद आणि राज कपूर हे कलावंत गाजले. चित्रपट संगीत लोकप्रिय झालेच होते. त्यामुळे हिंदी सिनेमामध्ये ‘साँग अॅण्ड डान्स’ हा फॉम्र्युला बनत चालला. श्रवणीय गाणी आणि संगीत हा हिंदी चित्रपटांचा अविभाज्य भाग झाला. नवकेतन फिल्म्सची स्थापना देव आनंद यांनी आपल्या बंधूंसोबत केली तर राज कपूर यांनी आर के फिल्म्स बॅनर स्थापन केला. हिंदी सिनेमातले ‘शो मॅन’ म्हणून राज कपूर, रोमॅण्टिक चॉकलेट हीरो आणि चिरतरुण अभिनेता म्हणून देव आनंद, ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून दिलीपकुमार यांची प्रतिमा निर्माण झाली. सत्यजित राय यांनी दिलीपकुमार यांच्याविषयी ‘अल्टिमेट मेथड अॅक्टर’ असे उद्गार काढले. हिंदी सिनेमात गुरुदत्त, बिमल रॉय, बी. आर. चोप्रा नंतर यश चोप्रा यांनी स्वतंत्रपणे चित्रपट निर्मिती केली. रोमॅण्टिक हिंदी सिनेमाचा प्रवाह सुरू असतानाच सामाजिक, कौटुंबिक विषयही हाताळले गेले. बिमल रॉय यांनी ‘दो बिघा जमीन’द्वारे समांतर सिनेमाची पाऊलवाट चोखाळली. पुढील काळात हिंदी सिनेमाचा मुख्य प्रवाह आणि समांतर सिनेमाचा प्रवाह असे दोन प्रवाह आले. व्हिट्टोरियो डिसिका यांचा इटालियन निओ-रिअॅलिस्टिक सिनेमा प्रवाहातील सिनेमा पाहून बिमल रॉय यांनी ‘दो बिघा जमीन’ बनविला. फॉम्र्युला प्रधान हिंदी चित्रपटात साठच्या दशकाच्या अखेरीला समांतर सिनेमा खऱ्या अर्थाने अवतरला. १९५५ साली ‘ऑल टाइम क्लासिक’ चित्रपटातील सत्यजित राय दिग्दर्शित ‘पथेर पांचाली’ या बंगाली चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटविली. त्यापूर्वी राज कपूरच्या ‘आवारा’ चित्रपटाला कान्समध्ये ‘पाम डी ओर’ हा बहुमान मिळाला. वास्तवदर्शी सिनेमाची सुरुवात ‘पथेर पांचाली’ने झाली. हिंदी सिनेमाचा ‘साँग अॅण्ड डान्स’ फॉम्र्युला ५०-६०-७० अशा तिन्ही दशकांत कायम राहिला. पुढे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला आलेल्या ‘भुवनशोम’ या मृणाल सेन दिग्दर्शित हिंदी चित्रपटाने समांतर सिनेमाची सुरुवात हिंदीत झाली असे म्हणता येईल.
राज कपूर-देव आनंद-दिलीपकुमार यांच्या माध्यमातून हिंदी सिनेमाचे नायक लोकप्रिय ठरले. नायककेंद्री सिनेमा हे हिंदीचे वैशिष्टय़ ठरले. मुख्य भूमिकेतील नायक कोण यावर हिंदी सिनेमाची व्यावसायिक गणिते ठरू लागली. या त्रिकुटानंतरच्या काळात शम्मी कपूर, राजेंद्र कुमार, मनोज कुमार इत्यादी अनेक अभिनेते नायक म्हणून गाजले. एकीकडे समांतर सिनेमाची वाटचाल हिंदीत सुरू झाली. त्याच दरम्यान म्हणजे सत्तरच्या दशकातील सुरुवातीच्या काळात राजेश खन्नाचा प्रवेश झाला आणि १९७३ सालापासून सातत्याने १५ सुपरहिट चित्रपट देऊन राजेश खन्ना हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार बनला. रोमॅण्टिक हीरो ही प्रतिमा कायम झाली. या काळात रोमॅण्टिक, सामाजिक, कौटुंबिक, रहस्यमय विषय मोठय़ा प्रमाणावर हाताळले गेले. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत अॅक्शनपट महत्त्वाचे ठरत नव्हते. परंतु जंजीर, शोलेनंतर अमिताभ बच्चन या आणखी एका सुपरस्टारचा उदय झाला. त्याचबरोबर अॅक्शनपटांचे महत्त्व वाढले. १९८०च्या दशकात अॅक्शनपटांचे प्रमाण प्रचंड वाढले त्यामुळे हिंदी सिनेमाला साचलेपण आले. अमिताभ बच्चनचा उदय झाल्यानंतर आपला वैशिष्टय़पूर्ण अभिनय आणि आवाज तसेच पडद्यावरचा वावर यामुळे हिंदी सिनेमाचा तो ‘आयकॉन’ बनला. ‘अॅँग्री यंग मॅन’ ही त्यांची प्रतिमा निर्माण झाली. ‘लार्जर दॅन लाइफ’ नायक त्यांनी साकारला. रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेले अमिताभ बच्चन यांचे स्थान आजही अबाधित आहे. टीव्हीच्या आगमनाने हिंदी सिनेमाचा प्रेक्षक मोठय़ा प्रमाणात घटला. त्यानंतर ८०च्या दशकात व्हिडीओ आल्याने पायरसीचे प्रमाण वाढले. चित्रपटगृहात हाऊसफुल्लचे बोर्ड लागणे कमी झाले. व्हिडीओचा मोठा फटका चित्रपटांच्या निर्मात्यांना बसला. ऐंशीच्या उत्तरार्धात काळ बदलला. नायकांची पिढी बदलली. शाहरूख, आमिर, सलमान या खानांबरोबरच माधुरी दीक्षित, जुही चावला आदी अभिनेत्रींनी रुपेरी पडदा गाजवायला सुरुवात केली. तीन खानांचे वर्चस्व ९०च्या दशकात सुपरस्टार्स म्हणून राहिले.
जागतिकीकरणाचा स्वीकार देशाने केल्यानंतर हिंदी सिनेमात मोठय़ा प्रमाणावर जगभरातील बलाढय़ा सिनेमा कंपन्यांनी पैसा ओतला. माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हिंदी सिनेमा तंत्रसफाईदार झाला. डिजिटल डॉल्बी साउण्ड, अद्ययावत कॅमेऱ्याचे तंत्र, माहिती तंत्रज्ञानातील विकासामुळे चित्रपट प्रक्रियेत मोठे बदल झाले. डिजिटलायझेशनमुळे सिनेमा अधिक चकचकीत झाला. सिनेमा बनविण्यासाठी लागणारा वेळ कमी झाला. मुख्य म्हणजे परदेशी कंपन्यांनी चित्रपटांना वित्तपुरवठा केला, चित्रपट निर्मितीत मोठा सहभाग घेतला. त्यामुळे मुख्य कलावंतांना मोठय़ा प्रमाणावर मानधन मिळू लागले. मल्टिप्लेक्सच्या उदयानंतर पुन्हा हिंदी सिनेमाचा फॉम्र्युला बदलला. स्टार कलावंत नसूनही वैशिष्टय़पूर्ण विषय हाताळून हिंदी सिनेमा प्रेक्षकप्रिय ठरू लागला. स्टार कलावंतांच्या नावावर सिनेमा विकत घेण्याचे पर्व मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून तर शाहरूख खान, सैफ अली खान, आमिर खान, सलमान खान यांच्यापासून ते अजय देवगण व अन्य कलावंतांचाही निर्मितीमधील सहभाग मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे आर्थिक गणिते बदलली. १०० कोटी क्लब संकल्पना आली. यांसारखे अनेक बदल झाले आहेत. चित्रपटाची प्रिंट काढण्याचा खर्च आतापर्यंत प्रचंड असायचा. परंतु, उपग्रहाद्वारे डिजिटली चित्रपट दाखविण्याची सोय उपलब्ध झाल्याने त्या खर्चात कपात झाली. त्याचे काही चांगले परिणामही झाले आहेत. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ५०-६० प्रिंट्स काढण्याचा खर्च वाचला. सिनेमा हे माध्यम विज्ञानाधिष्ठित असल्याने तंत्रज्ञान-विज्ञान जितके विकसित होत जाईल तसतसे या माध्यमात बदल होत राहतील. त्यामुळे अन्य गोष्टींवर होत असलेल्या बदलांमुळे चित्रपटांचे विषय, आशय, मांडणी यातही बदल होत राहतील.
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2013 रोजी प्रकाशित
गोष्ट सिनेमाच्या शताब्दीची..
भारतीय चित्रपटांचे हे शतसांवत्सरिक वर्ष असून त्यानिमित्त चित्रपटातील मराठी दिग्गजांच्या योगदानाची दखल घेत मुख्यत्वे हिंदी सिनेमाचे महत्त्वाचे टप्पे, व्यक्ती, चित्रपट यांचा अतिशय थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे..
First published on: 28-04-2013 at 12:13 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of cinema century