शारदा आर्ट अकादमीच्या चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
निसर्ग, सजीवसृष्टी व मानवी जीवनाचे भावविश्व चित्रकार कुंचल्यातून समर्थपणे साकार करतात. कला हा जिवंत व प्रेरणादायी साक्षात्कार आहे. कलेला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांची कल्पकता व सर्जनशीलता वाढविल्यास ते समर्थ व दर्जेदार चित्रकार होऊ शकतात, असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक विभागीय व्यवस्थापक मिलिंद आपटे यांनी केले. ते बुलढाणा एज्युकेशन सोसायटीच्या एडेड व शारदा परिवाराच्या आर्ट अकादमीने आयोजित केलेल्या भव्य चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
येथील शारदा ज्ञानपीठात आर्ट अकादमीच्या वतीने स्वातंत्र्यदिनापासून पाच दिवसांच्या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार सोमनाथ सावळे यांनी केले. या वेळी बुलढाणा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, सचिव बाळासाहेब कविमंडन, ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शोभा देशपांडे, स्टेट बँकेचे सहाय्यक विभागीय व्यवस्थापक मिलिंद आपटे, नेत्र शल्यचिकित्सक
डॉ. सुभाष जोशी, शारदा ज्ञानपीठाच्या प्राचार्य जगताप, आर्ट मास्टर व प्रदर्शनाचे संयोजक विक्रम धावंजेवार यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते. या वेळी वंदना ढवळे संपादित साप्ताहिक ‘जिव्हाळा’ या स्त्री जागृतीविषयक वृत्तपत्राचे प्रकाशन
डॉ. शोभा देशपांडे व दै. विदर्भ दर्पणच्या उपसंपादक सुरेखा सावळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात चित्रकार सुभाष देशमुख, आर्ट मास्टर विक्रम धावंजेवार, शिक्षिका निलिमा वैष्णव, शारदा ज्ञानपीठाच्या विद्यार्थिनी श्रुती सावळे, स्पर्शा देशमुख, अमृता मानकर, अस्मिता काळे, यास्मीन श्रीवास्तव यांच्यासह अनेक मान्यवर कलाकारांच्या अतिशय दर्जेदार कलाकृतींचा सहभाग होता. या प्रदर्शनाला शहरातील हजारो चित्ररसिक, चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट दिली.