‘महावितरण’ या राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ‘उपकेंद्र साहाय्यक’ या नव्याने निर्माण केलेल्या पदाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजारांहून अधिक पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. कनिष्ठ यंत्रचालकपदाशी साम्य असलेल्या या पदासाठी महावितरणच्या नियमानुसार आय.टी.आय. अभ्यासक्रम तसेच शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केलेला उमेदवारच या पदासाठी योग्य ठरू शकत होता. मात्र नुकत्याच नव्याने जाहीर केलेल्या पदांच्या शैक्षणिक अर्हतेतून आय.टी.आय. अभ्यासक्रमच वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे खासगी संस्थांमधील अल्पशिक्षित, अकुशल कर्मचारीच महावितरणच्या सेवेत भरती होण्याची भीती महावितरणचे अधिकारी व्यक्त करू लागले आहेत.
महावितरणची मार्चमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन पद्धतीने उपकेंद्र साहाय्यक पदे भरण्यात येणार आहेत. यापूर्वी महावितरणच्या अ‍ॅक्टमधील तरतुदीनुसार आय.टी.आय. ट्रेड कोर्स पूर्ण करून एक वर्षांचा अनुभव असणारे उमेदवार या पदासाठी पात्र ठरत असत. विद्यार्थाना एक वर्ष प्रशिक्षण आणि एक वर्ष अनुभव असा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून महावितरण आपल्या सेवेत घेत होती. मात्र उपकेंद्र साहाय्यकांची पदे भरण्यासाठी काढण्यात आलेल्या सुधारपत्रकातून आय.टी.आय. ट्रेड कोर्स या अभ्यासक्रमाचा उल्लेखच काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे आय.टी.आय. अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या भरती प्रक्रियेतून अपात्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर खासगी संस्थेतून इलेक्ट्रिक, वायरमन असे सहा महिने, एक वर्षांचा कोर्स पूर्ण करणारे उमेदवार एखाद्या खासगी कारखान्यात अनुभवाची पात्रता पूर्ण करून महावितरणमध्ये दाखल होण्याचे मार्ग खुले झाले आहेत. याचा फटका आय.टी.आय.मधून शिकणाऱ्या विद्यार्थाना बसणार आहे.
अकुशल कर्मचाऱ्यांचा भरणा..
 उपकेंद्र साहाय्यक पदावरील कर्मचाऱ्याचा सातत्याने विद्युत प्रवाहाशी असलेल्या यंत्रणेशी संपर्क येत असल्यामुळे या पदावर योग्य शैक्षणिक गुणवत्ता असलेले आणि कुशल कर्मचारी असणे गरजेचे आहे. आय.टी.आय.मधून अशा चांगल्या पद्धतीने कुशल कर्मचारी उपलब्ध होत असतात. मात्र अशा प्रकारे जोखमीचे काम करण्याची क्षमता नसणारे अकुशल कर्मचारी या नव्या सुधारपत्रामुळे भरती होऊ शकतात. त्याच परिणाम महावितरणच्या कामावर होण्याची भीती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.