एप्रिलच्या प्रारंभापासून असलेले जीवाची काहिली करणारे हवामान आणि जिल्ह्य़ातील काही भागात दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. मेडिकल, मेयो आणि आयसोलेशन रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसात १२५च्या जवळपास रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. त्यात सर्वात जास्त आयसोलेशन रुग्णालयात ४० रुग्णावर उपचार करण्यात आले.
 उन्हाळ्यातील आजार, उष्माघाताच्या घटनांना तोंड देण्यासाठी शहरातील विविध शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष (शीत वॉर्ड) तयार करण्यात आले असून, शहरातील इतर खाजगी रुग्णालयांतही व्यवस्था करण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात उन्हाची काहिली वाढण्यास सुरुवात झाली असून शहरासह विदर्भात ४२ आणि ४३ अंश से. तापमान पोहचले आहे. ग्रामीण आणि शहरातील काही भागात दूषित पाणी येत असताना त्या दूषित पाण्याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर दिसून येत आहे.
शहरातील विविध शासकीय रुग्णालयात फेरफटका मारला असता शीत वॉर्डमध्ये उष्माघाताचे रुग्णांची संख्या कमी आहे मात्र, गॅस्ट्रो रुग्णांची संख्या जास्त आहे. मेडिकलसहीत आयसोलेशन हॉस्पिटमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ४० बेड असून १० परिचारिका व ५ डॉक्टर्स आहेत. दोन दिवसापूर्वी शासकीय मेडिकल रुग्णालयात १२ रुग्ण , महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात १३ तर मेयो रुग्णालयात ४ रुग्णांवर उपचार करण्यात आहे. गेल्या वीस दिवसात ११० गॅस्ट्रोच्या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. मेडिकलमध्ये १४०१ खाटा आहेत. त्यापैकी १०० खाटा या बालरुग्णांसाठी आहेत १ ते २ वयोगटातील बाल रुग्णांवर उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात वार्ड ३, ५, ६ व ८ असे चार वार्ड आहेत. याचारही वार्डात ८० टक्के बालरुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. मुरारी सिंग यांनी दिली. उन्हाच्या कडाक्यासोबत व्हायरल ताप, सर्दी, खोकला आदी किरकोळ आजारांनी लहान मुले ग्रस्त आहेत. गढूळ पाणी पिणे, शिळे अन्न, उन्हात फिरणे आदी कारणामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. रुग्णांना बारीक ताप येणे, हगवण लागणे, अंगदुखी पाठदुखी, डोकेदुखी, मळमळ होणे ही गॅस्ट्रोची लक्षणे असल्याचे मुरारी सिंग यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्यातील आजार, उष्माघाताच्या घटनांना तोंड देण्यासाठी शहरातील विविध रुग्णालय स्वतंत्र कक्ष (शीत वॉर्ड) तयार करण्यात आले असून, शहरातील इतर खाजगी रुग्णालयांतही व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ४३ अंशांवर पोहोचलेले प्रखर उन्ह तर काही भागात असलेली पाणी टंचाई आणि गढुळ पाण्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. उन्हामुळे अनेक जिल्ह्य़ातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयाचे डॉ. कुर्वे यांच्याशी साधला असता त्यांनी सांगितले, दूषित पाणी आणि रस्त्यावरील उघडे पदार्थ खाण्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. तालुका पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराच्या दृष्टीने सोयी सुविधा अपुऱ्या असल्यामुळे शहरात मेडिकल आणि मेयोमध्ये गॅस्ट्रो रुग्णाची संख्या वाढत आहे.
या संदर्भात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर म्हणाले, महापालिकेच्या आणि ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालयात उन्हाळ्याच्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली असून सर्व डॉक्टर आणि परिचारिकांना रुग्णांच्या आरोग्यबाबत हयगय केली जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहे. गॅस्ट्रोच्या रुग्णाची संख्या शहरात फारशी नाही नसली ग्रामीण भागातून रुग्ण येत आहे.
महापालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात गॅस्ट्रोच्या रुग्ण येत असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे त्यामुळे बाहेरचे पाणी आणि रस्त्यावरील उघडे पदार्थ खाताना काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. गणवीर यांनी केले.