कल्याण-डोंबिवली पालिकेतील खासगी वाहतूकदार पुरवठा करण्यात येत असलेल्या वाहनांची माहिती माहिती अधिकारात मागवताच, काही तरी बलामत येण्याची भीती वाटल्याने खासगी वाहतूकदाराने वाहन विभागाच्या उपायुक्तांच्या सूचनेवरून पालिकेच्या सेवेत तडकाफडकी ‘टी’ परमिटची वाहने दाखल केली आहेत. ‘टी’ परमिट वाहनांवर ‘डय़ुप्लिकेट’ सेवा देणाऱ्या पालिका मुख्यालयातील इतर खासगी वाहन चालकांना पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये पिटाळण्यात आले असल्याचे बोलले जाते.
कल्याणमधील बेतुरकरपाडा येथील ‘मे. हरदिप रोडवेज’चे बाबा तिवारी कल्याण डोंबिवली पालिकेला खासगी वाहने पुरवतात. २ मार्च २०१२ मध्ये पालिकेच्या स्थायी समितीने पालिकेला वाहने पुरवठा करण्याच्या ठरावाला मंजुरी दिली आहे. मार्च २०१२ मध्ये पालिकेने ‘हरदिप रोडवेज’बरोबर वाहन पुरवण्याचा करार केला आहे. त्यानुसार पालिकेला ‘टी’ परवाना वाहने पुरवण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. तसेच ठेका चालू असताना सर्व शासकीय नियम पालिका प्रशासन आणि ठेकेदाराला बंधनकारक असतील. दरदिवशी प्रत्येक वाहन किमान १० किलोमीटर तर महिन्याला दोन हजार किमी धावणे आवश्यक आहे. दर दिवशीचा वाहनाचा दर अकराशे रुपये आहे. मात्र यापैकी बहुतेक अटींचे सर्रास उल्लंघन होत असताना वाहन विभागाचे उपायुक्त सुरेश पवार मात्र बघ्याची भूमिका घेऊन बसले असल्याची टीका होत आहे. ‘टी’ परमिट असलेल्या व नसलेल्या सर्व वाहनांची यादी ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध आहे.
पालिकेच्या मुख्यालय व प्रभाग कार्यालयातील बहुतेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्वत:ची वाहने आहेत. त्यामुळे वाहतूकदाराची खासगी वाहने पालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालयांमध्ये दिवसभर धूळ खात उभी असतात. त्यांची दररोजची धावसंख्या एक ते दोन किलोमीटरहून अधिक होत नसल्याचे बोलले जाते. पालिका अधिकाऱ्यांना वाहन भत्त्यापोटी दरमहा प्रशासनाकडून २२ ते २५ हजार रुपये मिळतात. वाहन विभागातील एका अधिकाऱ्याच्या ‘खासगी’ व पालिकेच्या वापरासाठी दोन गाडय़ा आहेत. केवळ वाहन विभागाचे अधिकारी, नगरसेवक, त्यांचे समर्थक, काही पत्रकार आणि ठेकेदाराला ‘पोसण्यासाठी’ खासगी ठेकेदाराची व्यवस्था पालिकेत करण्यात आल्याचे बोलले जाते. डोंबिवलीतील आणखी एक खासगी वाहतूकदार पालिकेला वाहने पुरवत आहे. त्याची माहिती वाहन विभागाने दिली नाही.
’ धनादेश ठेकेदाराच्या नावाने
पालिकेला खासगी ठेकेदाराकडून पुरवण्यात येणारी आणि खासगी व्यक्तींकडून ठेकेदाराला सामील झालेल्या सर्व वाहन चालकांचे एकूण देयक पालिका प्रशासन मे. हरदिप रोडवेज या नावाने काढते. एकूण देयकातील रक्कम ठेकेदार स्वत:साठी व त्यांना साहाय्य करणाऱ्या वाहन चालकांना देण्याचे काम करतो, असे काही वाहन मालकांनी सांगितले.
’ वाहने बदलली
पालिकेत वाहन विभागातर्फे खासगी ठेकेदाराची किती वाहने चालू आहेत. अशी माहिती माहिती अधिकारात मागवताच, वाहन विभागाचे उपायुक्त व ठेकेदार यांची तारांबळ उडाली. ‘आरटीओ’ची कारवाई टाळण्यासाठी तातडीने पालिकेच्या सेवेत ‘टी’ परवाना असलेली ‘काळा नंबर आणि पिवळी पट्टी’ असलेली वाहने दिसू लागली आहेत. अशा प्रकारची सुमारे १२ ते १३ वाहने तडकाफडकी पालिका सेवेत रुजू करण्यात आली असल्याचे बोलले जाते. हा सर्व गडबड घोटाळा लपवण्यासाठी वाहन विभागाचे उपायुक्त सुरेश पवार अधिक सक्रिय असल्याचे बोलले जाते. काही वर्षांपूर्वी सुरेश पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले होते. दोन दिवस उलटून गेले तरी उपायुक्त सुरेश पवार या विषयावर कोणतीही लेखी प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.
’ वाहने बदलल्याची कबुली
मे. हरदीप रोडवेजचे बाबा तिवारी यांनी कल्याण डोंबिवली पालिकेला आपण ‘टी’ परमिटची वाहने पुरवतो. दोन ते चार गाडय़ा कधी बंद पडतात. त्या बदल्यात काही वाहने पुरवली जातात. आताच ‘टी’ परमिटची सगळी वाहने पालिकेला बदलून दिली आहेत, अशी माहिती दिली.
’ ‘आरटीओ’चे कारवाईचे संकेत
‘टी’ परमिट न घेता, कर भरणा न करता कोणतेही खासगी वाहन कंपनी, निमशासकीय कार्यालयात वाहतूक करताना ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकास आढळले तर मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेश सरक यांनी दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2014 रोजी प्रकाशित
‘आरटीओ’ची कारवाई टाळण्यासाठी ‘टी’ परमिटची वाहने पालिकेच्या सेवेत
कल्याण-डोंबिवली पालिकेतील खासगी वाहतूकदार पुरवठा करण्यात येत असलेल्या वाहनांची माहिती माहिती अधिकारात मागवताच, काही तरी बलामत येण्याची भीती वाटल्याने खासगी
First published on: 27-11-2014 at 12:33 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T permit vehicles in municipal service to avoid r t o action