कळकटलेल्या, धुरकट काचांमधून काही ठरावीक जातींच्या माशांचे दर्शन हे कालपरवापर्यंत मरीन ड्राईव्ह येथील ‘तारापोरवाला मत्स्यालया’त असलेले दृश्य लवकरच इतिहासजमा होणार आहे. आता डोळ्यांचे पारणे फिटेल देशीबरोबरच आकर्षक आणि अद्भुत मासे येणार असून आधुनिकतेचा साज चढवून हे मत्स्यालय मुंबईकरांसाठी सज्ज करण्यात येत आहे.
तारापोरवाला मत्स्यालयात आतापर्यंत कासव, स्टींग रे आदी विशिष्ट प्रजातींचे मासेच सरसकटपणे पाहायला मिळत. पण, आता या देशी माशांच्या सौंदर्याची टक्कर पर्पल फायर, व्हाईट टेल ट्रिगर आदी विविध प्रकारच्या परदेशी माशांशी असणार आहे. पर्यटकांसाठी नव्याने येथे आणल्या जाणाऱ्या या सर्व माशांचे दर्शनही छान व्हावे यासाठी त्यांचे ‘घरकुल’ असलेल्या पाण्यांच्या टाक्यांची रचनाही वेगळय़ा पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे, ‘थर्ड जनरेशन’चे म्हणून बांधण्यात आलेले हे मत्सालय येत्या काळात दक्षिण मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र ठरेल अशी आशा आहे.
१९५१ साली बांधण्यात आलेले तारापोरवाला मत्स्यालय कधीकाळी मुंबईच्या वैशिष्टय़ांपैकी एक म्हणून गणले जाई. पण, मत्स्यालय व्यवस्थापनात काळानुरूप होणाऱ्या बदलांमुळे पुढेपुढे तारापोरवाला मत्स्यालयाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. तरीही नूतनीकरणासाठी म्हणून सप्टेंबर, २०१३ ला हे मत्स्यालय बंद करेपर्यंत वर्षांकाठी चार ते साडेचार लाख पर्यटक येथे भेट देत असत.
सिंगापूमधील जॉर्जिया मत्स्यालयाप्रमाणे तारापोरवाला मत्स्यालयही अंडरग्राऊंड करण्याचा विचार पुढे आला होता. पण, मरीन ड्राईव्हचा उथळ समुद्र या प्रकारच्या मत्स्यालयासाठी योग्य नसल्याने हा प्रस्ताव बारगळला. मग, आहे त्याच जागेत आधुनिक पद्धतीने मत्स्यालयाची उभारणी करण्याचा निर्णय झाला. या शिवाय आतापर्यंत या मस्त्यालयात केवळ स्थानिक प्रकारचे खाऱ्या आणि गोडय़ा पाण्यातील माशांच्या प्रजाती ठेवण्यात आल्या होत्या. त्या ऐवजी खाऱ्या पाण्यातील तब्बल ६० ते ७० आणि गोडय़ा पाण्यातील २० ते ४० वेगवेगळ्या देशी-विदेशी प्रजाती मत्स्यालयात ठेवण्यात येणार आहेत. अझुरा डॅमसेल, ब्ल्यू फाईन डॅमसेल, पर्पल फायर फीश, क्लाऊडीडॅमसेल, कॉपर बॅण्डेड बटरफ्लाय, व्हाईट टेल ट्रिगर, क्लोन ट्रिगर, टँगफिश आदी विविध प्रकारचे मनोहारी मासे मत्स्यालयात पाहता येतील.
मत्स्यालयातील आधीच्या १६ पैकी १२ टाक्यांची उंची वाढवून सात फूट करण्यात आली आहे. आधीची साधी काच बदलून मत्स्यदर्शन अधिक स्वच्छपणे व्हावे यासाठी उत्तम दर्जाच्या काचा या टाक्यांना बसविण्यात आल्या आहेत. हे संपूर्ण मत्स्यालय वातानुकूलित असणार आहे. टाक्यांमधील माशांचे दर्शन अधिक मनोहारी व्हावे यासाठी टाक्यांच्या आतील रचना आणि रंगसंगती त्या त्या माशांच्या रंगांना साजेशी अशी असेल. या शिवाय एलईडीसारख्या आधुनिक प्रकाशयोजनेचा वापर करून या टाक्या उजळवून टाकल्या जाणार आहेत. या शिवाय आधुनिक फिल्टरेशन व्यवस्था, माशांची व सागरी पर्यावरणाची माहिती देण्यासाठी अ‍ॅम्फी थिएटर अशी व्यवस्था असणार आहे.
शुल्क वाढणार
तारापोरवाला मत्स्यालयासाठी ५ ते १५ रुपये असे शुल्क पर्यटकांकडून घेतले जाई. मात्र, नव्या मत्स्यालयात मत्स्यदर्शनासाठीचे शुल्क काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. हे शुल्क जवळपास दुप्पट होण्याचा अंदाज आहे.