शेतीत काबाडकष्ट करून, घाम गाळून शेतकऱ्याने कितीही उत्पादन घेतले तरी त्याला योग्य भाव मिळत नाही. मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याच्या कुटुंबाचे पालनपोषणही होत नाही. त्यामुळे गावागावात आणि मोहल्ल्या मोहल्ल्यात शेतकरी बाजार असायला हवा. तेथे शेत मालाला योग्य भावही मिळेल आणि ग्राहकालाही माफक भावात शेतमाल मिळेल. शेतकरी सुखी झाला तरच देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था मजबूत होईल. पर्यायाने देश सुखी होईल, असे स्पष्ट प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी केले.
रेशीमबाग मैदानावर आयोजित ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ या पाचव्या कृषी कार्यशाळा व प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. खासदार अजय संचेती व हंसराज अहीर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे व सुधीर मुनगंटीवार, महापौर अनिल सोले, उपमहापौर जैतुनबी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गोतमारे, संयोजक गिरीश गांधी व रमेश मानकर, सल्लागार डॉ. सी. डी. मायी, फ्युचर ग्रूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियाणी, नुझीविडू सीड्सचे मुख्य महाव्यवस्थापक एम. प्रभाकर राव, आयटीसीचे कृषी व्यवसाय विभागाचे विभागीय मुख्य संचालक एस. शिवकुमार, ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वातंत्र्यापूर्वी देशातील ७५ टक्के जनता शेतीवर अवलंबून होती. आता ही संख्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाली आहे. भरघोस उत्पन्न मिळवून देणारा शेती व्यवसाय आता तोटय़ाचा झाला आहे. शेतीत काबाडकष्ट करून, घाम गाळून शेतकऱ्याने कितीही उत्पादन घेतले तरी त्याला योग्य भाव मिळत नाही. मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याच्या कुटुंबाचे पालनपोषणही होत नाही. त्यामुळे आता गावाकडून शहराकडे स्थलांतरण होऊ लागले आहे. हा गंभीर व चिंतेचा विषय असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. मुळात शेती व शेतीवर आधारित उद्योगात ५० टक्क्क्यांहून अधिक रोजगार मिळू शकतो. नवनव्या तंत्रज्ञानांची माहिती शेतकऱ्यास उपलब्ध झाल्यास एक एकर जमिनीतून मिळालेल्या उत्पन्नात शेतकरी त्याच्या कुटुंबाच्या किमान गरजा भागवू शकतो. प्रत्यक्षात विविध संशोधन, तंत्रज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. ही सरकारचे अपयश आहे. शेतमालाचे उत्पादन वाढून या व्यवसायाला जास्तीत जास्त नफा मिळवून देणे गरजेचे आहे.
जैविक शेती जगभरात वाढत असताना लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात का वाढू शकत नाही, हा प्रश्न पडला आहे. स्वातंत्र्यापूर्वी देशात जैविक शेतीचा अवलंब होत होता. त्यानंतर केवळ उत्पादन वाढावे म्हणून रसायनांचा वापर शेतीत होऊ लागला. परिणामी आर्थिक संकट वाढलेच. शिवाय आरोग्याची समस्याही उभी झाली. जैविक कीटकनाशके, जैविक बियाणे, जैविक खतांच्या वापराने उत्पादन वाढू शकते. तीन वर्षे रसायनांचा वापर टाळून जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सबसिडी तसेच जास्तीत जास्त सवलती द्यायला हव्यात. प्रत्येक जिल्हास्थानी मोठय़ा प्रमाणावर प्रयोगशाळा ठेवाव्यात. माती परीक्षणाचीही सोय करून किसान कार्ड द्यायला हवे. संवेदनशील सरकारला कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देणे आवश्यकच आहे. जमीन व जनतेत मिळून काम करावे लागेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अ‍ॅग्रोव्हिजनचा ट्रस्ट करण्याचा विचार असून फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून अल्पदरात माती परीक्षण केले जाईल व किसान कार्ड दिले जाईल, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली. आत्महत्येच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना नवी दिशा देणे, या उद्देशाने अ‍ॅग्रोव्हिजनचे आयोजन केले जाते. भंडारामध्येही आता ऊस शेती होऊ लागली आहे. एक किलोचे सीताफळ होते, यवतमाळमध्ये जैविक गूळ तयार होतो. विदर्भातही जैविक शेती होऊ लागली आहे. ज्ञान, विज्ञान व तंत्र ही एकविसाव्या शतकातील त्रिसूत्री आहे. त्रुटी कमी करून तसेच चांगल्या बाबींचा अवलंब वाढवून विकासाकडे वाटचाल करावी लागेल, असे नितीन गडकरी म्हणाले. व्यासपीठावर उपस्थित उद्योजकांची भाषणे झाली. या प्रदर्शन तसेच कार्यशाळांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रारंभी बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. गिरीश गांधी व रवींद्र बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. देवेंद्र पारेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. रमेश मानकर यांनी आभार मानले.
क्षणचित्रे
*राजनाथ सिंह यांनी रेशीमबागेतील स्मृती भवनात जाऊन संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक माधव सदाशीव गोळवलकर उपाख्य गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.
*कार्यक्रमस्थळी आल्यानंतर त्यांनी ‘सोरिक्षा’मध्ये बसून प्रदर्शनात फेरफटका मारला. प्रत्येक स्टॉलला भेट देऊन त्यांनी पाहणी केली.
*कार्यक्रमाला ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांबरोबरच शहरातून अनेक नागरिक आले होते.
*अ‍ॅग्रोव्हिजनची डायरेक्टरी तसेच कृषी कल्याण मासिकाच्या अ‍ॅग्रोव्हिजन विशेषांकाचे याप्रसंगी प्रकाशन झाले.
*२९ डिसेंबपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. कृषी क्षेत्रासंबंधी विविध विषयावर कार्यशाळा हेणार असून तज्ज्ञ माहिती देतील.