जुन्या वैमनस्यावरून झालेल्या दोन गटातील भांडणात सुरुवातीला एक दुसऱ्याला मारहाण झाली. त्यात दोन्ही गटाने तलवारीने हल्ला केला. यानंतर एका गटाने दुसऱ्या गटाच्या सदस्यांवर गोळीबार केला. दोन गटात झालेल्या संघर्षांत दोन महिलांसह एकूण दहा जखमी झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींना कामठी व नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर कन्हानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तेथे दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी भेट देऊन घटनेची माहिती मिळवली. सध्या कन्हानमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
या भांडणाला गेल्यावर्षी झालेले मनीष रेड्डी खून प्रकरण आणि वाळू चोरी हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी दोन्ही गटाने एक दुसऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून यावरून कन्हान पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. योगेश यादव आणि कमलेश मेश्राम यांनी या तक्रारी केल्या आहेत. आरोपी कमलेश मेश्राम, नितेश मेश्राम, आकाश महतो, उमेश यादव, मनोज राय, विक्की यादव, मोनू मनपिया, आकाश चंभारे, दादा मुळे हे मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास कन्हानमधील विवेकानंद नगरातील रहिवासी योगेश फूलसिंह यादव याच्या घरी आले व त्यांनी योगेशला पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी योगेश यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर तलवारीने हल्ला केला. त्यात योगेश यादवच्या गटातील चार-पाच जण जखमी झाले.
यानंतर कमलेश मेश्राम व त्याचे साथीदार रात्री ११.३० वाजता कन्हान मधील इंदिरानगरातील आपल्या घरी असताना आरोपी योगेश यादव, राजा यादव, विपिन गोंडाने, गोलू यादव, राहुल व फैजान तेथे गेले. तेथे त्यांनी घरात शिरून कमलेश मेश्राम व त्याच्या सहकाऱ्यांवर तलवारीने हल्ला केला. यानंतर त्यांनी पिस्तूलमधून गोळ्या झाडल्या. त्यात कमलेश मेश्राम याच्या हाताला एक तर दादा मुळे याच्या हाताला एक गोळी लागली. कमलेशचा भाऊ नितेश व अल्केश, त्याची आई व गोंडाने याची पत्नीही जखमी झाले. या पाचही जणांवर कन्हान येथील रॉय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही गटातील जवळपास १० ते १२ जण जखमी झाले आहे. बुधवारी सकाळी एका जखमीला नागपूरला हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस घटनास्थळी पोहचले. या घटनेनंतर कन्हानमध्ये रात्रीपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्रीपासूनच कन्हान येथे कामठी, मौदा पोलीस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी पाठवण्यात आला. दंगा नियंत्रक पथकही बोलावण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी मेश्राम आणि यादव हे दोन्ही गट एकत्रच काम करत होते. गेल्यावर्षी मनीष रेड्डी याचा खून झाला होता. मनीष हा मेश्रामच्या गटातील होता. तेव्हापासून यादव आणि मेश्राम हे दोन गट निर्माण झाले. मनीषच्या खूनप्रकरणात कमलेश मेश्राम हा प्रत्यक्ष साक्षीदार होता. तसेच यादव आणि मेश्राम या दोन्ही गटांचे वाळू चोरी करणे हे मुख्य काम आहे. त्यातून त्यांच्यात आणखी संघर्ष निर्माण झाला होता. मंगळवारी रात्री १०.३० वाजता वाळू घाटावरच त्यांच्यात संघर्ष झाला. सुरुवातीला मेश्राम गटाने यादव गटावर हल्ला केला. यानंतर यादव गटाने मेश्रामच्या घरी जाऊन त्याच्यावर व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेनंतर बुधवारी सकाळी नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, कामठीचे पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश कंटेवार यांनी कन्हान पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही.
सध्या कन्हानमधील विवेकानंदनगर आणि इंदिरानगर परिसरात पोलिस तैनात करण्यात आले असून तणावपूर्ण शांतता असल्याचे कन्हान पोलिसांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2015 रोजी प्रकाशित
कन्हानमध्ये गोळीबार; तिघे गंभीर
जुन्या वैमनस्यावरून झालेल्या दोन गटातील भांडणात सुरुवातीला एक दुसऱ्याला मारहाण झाली. त्यात दोन्ही गटाने तलवारीने हल्ला केला.
First published on: 26-03-2015 at 01:24 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three serious in firing