कळंबोली वाहतूक चौकात मोठय़ा प्रमाणावर वाहनांची कोंडी होऊ लागली असून शीव-पनवेल महामार्गावरील या महत्त्वाच्या चौकात चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अवस्था आगीतून फुफाटय़ात पडल्यासारखी झाली आहे.
शीव-पनवेल महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने या मार्गावर आधीच जागोजागी वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. असे असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचे प्रवेशद्वार आणि कळंबोली सर्कल परिसरात वाहनांची मोठी कोंडी होत असल्याने प्रवासी हैराण होऊ लागले आहेत. याच भागात नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांच्या आग्रहास्तव सिग्नल बसविण्यात आले असून यामुळे ही कोंडी आणखी वाढली आहे.
कळंबोली चौकाचा घेर आधीच मोठा असल्याने या भागात वाहने खोळंबतात, असा आजवरचा अनुभव आहे. उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदराकडे जाणारी अवजड वाहने तसेच कळंबोली, खांदा कॉलनी, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी या चौकात होत असते.
वर्षांनुवर्षे प्रयत्न करूनही या चौकातील वाहतुकीची कोंडी कमी करणे पोलिसांना जमलेले नाही. त्यामुळे पनवेलमार्गे मुंबई-पुणे तसेच मुंबई-गोवा हे अंतर कापणाऱ्या वाहन चालकांना तासन् तास कळंबोली चौकात खोळंबून राहावे लागते, असे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर या चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे प्रवाशांची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
वाहतूक विभाग सिडकोच्या माध्यमातून सायन पनवेल मार्गालगतचे जुने सबवे सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र हे सबवे दुरुस्त करून सुरू होण्यास उशीर लागणार आहे. सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशी ही कोंडी अजून मोठी होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2014 रोजी प्रकाशित
कळंबोली चौक वाहतूक कोंडीचे आगार
कळंबोली वाहतूक चौकात मोठय़ा प्रमाणावर वाहनांची कोंडी होऊ लागली असून शीव-पनवेल महामार्गावरील या महत्त्वाच्या चौकात चुकीच्या पद्धतीने
First published on: 11-02-2014 at 06:55 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic problem in kalamboli chawk