वाहतुकीच्या विषयावर शालेय व महाविद्यालयीन जीवनात शिक्षण देण्याच्या उद्देशाने साकारण्यात येणाऱ्या ‘चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशनल पार्क’चे भूमिपूजन शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे. नाशिक फर्स्ट आणि महानगरपालिका यांच्यातर्फे व पोलीस आयुक्तालय यांच्या सहकार्याने साकारला जाणारा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे. शहरात वेगाने वाढणारी वाहनांची संख्या आणि त्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन वाहतुकीविषयी विद्यार्थी दशेतच संस्कार घडविण्याचा मुख्य उद्देश या उद्यानामागे आहे. पुढील सहा महिन्यात या उद्यानाचे काम पूर्णत्वास नेण्याचा संकल्प नाशिक फर्स्टने केला आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता महापौर अॅड. यतिन वाघ आणि आयुक्त संजय खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा होणार असल्याची माहिती नाशिक फर्स्टचे संस्थापक अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी दिली. विद्यार्थ्यांसह नागरिकांना वाहतूक नियम अवगत करून देणारे हे अनोखे उद्यान ठरणार आहे. मोटकरी नगरमधील १२ हजार चौरस मीटर जागेवर हे अनोखे उद्यान साकारले जाणार आहे. मुख्य रस्त्यावरून वाहन चालविताना चालकाला जो अनुभव घ्यावा लागतो, तो गृहीत धरून या उद्यानाची रचना केली आहे. त्यात एक व दोन पदरी रस्ते आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या सल्ल्यानुसार रस्त्यांवर वाहतुकीची चिन्हे उभी केली जाणार आहेत. तसेच वळणे, चढ-उतार, बोगदे, पाण्याने भरलेले खड्डे, खाचखळग्यांचे रस्ते आदी कृत्रिम पद्धतीने निर्माण केले जाईल. वाहन मागे घेणे, इंग्रजी आठ आकाराचे लूप वळण घेणे, चढ-उतारावरून वाहन चालविणे, कमी प्रकाशात वाहन कसे चालवावे तसेच रस्त्याचे काम सुरू असताना काय नियम पाळावेत याचे प्रशिक्षण उद्यानात मिळणार आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या सर्व चिन्हांचा बोध व्हावा, यासाठी चिन्हांचा अर्थ सांगणारे तसेच नियमांचे प्रबोधन करणारे फलकही उद्यानात लावण्यात येणार आहे. चालकांना नियम व चिन्हांची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण केंद्रही या ठिकाणी उभारले जाईल. या शिवाय, ‘अॅम्पी थिएटर’चाही प्रकल्पात समावेश आहे. त्यात प्रशिक्षण वर्ग, चर्चासत्र घेण्याची सुविधा राहील. प्रशिक्षणार्थी व अभ्यागतांसाठी कॅफेटेरियाही उभारण्यात येत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. संपूर्ण मैदानाच्या बाजूने सर्वात मोठे जॉगिंग पार्कही तयार केले जाईल. ज्येष्ठ नागरिक या ट्रॅकवरून चालण्याचा सराव करतील तर आतील भागात वाहन चालविण्याचा सराव करता येणार आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्थेचे शिक्षण देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या या प्रस्तावाला महापालिका आयुक्त खंदारे यांनी हिरवा कंदील दाखविला. या प्रकल्पासाठी महापालिकेने जवळपास तीन एकर जागा उपलब्ध करून दिली. विविध अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर उद्यानाच्या कामाची सुरुवात होत आहे. शक्य तितक्या लवकर हे काम पूर्णत्वास नेले जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. नाशिक फर्स्ट संस्थेने सामाजिक जबाबदारीचे भान आणि आधुनिक विकासात्मक संकल्पनेतील प्रबोधनात्मक विकास प्रकल्प म्हणून हा उपक्रम हाती घेतल्याचे अभय कुलकर्णी यांनी नमूद केले. रस्ते निर्माण होत असताना वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी वाहतूक नियम व शिस्तीला अनुसरून चालक निर्माण होणे आवश्यक आहे. या भूमिकेतून ‘ट्रॅफिक पार्क’ प्रकल्प उभारला जाणार आहे.