कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शेरेबाजी करण्याचे प्रकरण येथील आकाशवाणीतील दोन अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले असून या दोघांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. सहायक केंद्र निदेशक चंद्रमणी बेसेकर व कार्यक्रम अधिकारी अमर रामटेके या दोघांवरही कारवाई झाली आहे. आठ महिन्यांपूर्वी ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उजेडात आणले होते.
येथील आकाशवाणी केंद्रात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, महिला कर्तव्यावर असताना त्यांना उद्देशून अश्लील भाषेत शेरेबाजी करणे, असे प्रकार कार्यक्रम अधिकारी अमर रामटेके नेहमी करतात, अशी तक्रार महिलांनी केली होती. या केंद्राचे निदेशक चंद्रमणी बेसेकर यांनी प्रारंभी या तक्रारींकडे लक्ष दिले नाही. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उचलून धरल्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. यानंतर कार्यालयातील, तसेच बाहेरील महिला कार्यकर्त्यांची एक चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीने सर्वाचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर आपला अहवाल प्रसारभारतीला सादर केला. रामटेके यांनी अश्लील शेरेबाजी केल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. रामटेके यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार निदेशक बेसेकर यांनी केला, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला होता. रामटेके यांची मानसिक स्थिती ठीक नाही तेव्हा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, असेही यात म्हटले होते. त्याची दखल घेत रामटेकेंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात त्यांची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे आढळून आले.
या चौकशी समितीसमोर जबाब देताना रामटेके यांनी अश्लील शेरेबाजी व शिवीगाळ केली नाही, असा दावा केला होता. मात्र, महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याचे पुरावेच सादर केल्याने या दोघांना समितीने दोषी ठरवले. हा अहवाल प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी या दोघांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश जारी केले आहेत. बेसेकर यांची गोव्याच्या केंद्रात बदली करण्यात आली आहे, तर रामटेके यांना जळगावला पाठवण्यात आले आहे. याशिवाय, रामटेके यांच्या तीन वेतनवाढी रोखण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला असून आर्थिक दंड म्हणून त्यांच्या नियमित वेतनात कपात करण्यात आली आहे. सलग आठ महिने लढा दिल्यानंतर अखेर न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया या केंद्रातील तक्रारकर्त्यां महिलांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
रामटेके यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांना पुरस्कार देणाऱ्या येथील समाजसुधारकांना सुद्धा मोठा झटका बसला आहे.